‘भटके’ असले म्हणून काय झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:22 AM2018-04-08T00:22:51+5:302018-04-08T00:22:51+5:30

कुत्रा म्हणजे इमानी मालकनिष्ठ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्वार्थी युगात कुत्र्याला होणारी हाडतुड संवेदनशील मनाला वेदना देऊन जाणारी आहे.

 What happened as 'stray' ... | ‘भटके’ असले म्हणून काय झाले...

‘भटके’ असले म्हणून काय झाले...

- कौस्तुभ दरवेस

कुत्रा म्हणजे इमानी मालकनिष्ठ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्वार्थी युगात कुत्र्याला होणारी हाडतुड संवेदनशील मनाला वेदना देऊन जाणारी आहे. माध्यमांतून श्वानदंशाचा मुद्दा चवीने दाखविण्याचे मुख्य कारण म्हणजे इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करायच्या मानवी अधिकारांवर श्वानांनी केलेले आक्रमण. कारण ऐरवी मनुष्यप्राणी सर्व प्राणिमात्रांवर येनकेन प्रकारे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र श्वानदंशाच्या घटना म्हणजे मनुष्याच्या या हक्कावर श्वानांनी केलेले आक्रमणच.
आपल्याकडे मुद्द्याचे राजकारण करण्याची आणि त्यातून आर्थिक फायदा उकळण्याची परंपराच आहे. कोणत्याही प्रश्नाचे अभ्यासपूर्ण उत्तर शोधण्यापेक्षा थातूरमातूर उत्तरे शोधण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत. त्यामुळे भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर होऊन समोर येत आहे. श्वानसंख्या नियंत्रणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात दिवसेंदिवस अपयश येत आहे. तसे पाहायला गेलो तर कुत्रा, मांजर हे प्राणी हजारो वर्षांपासून माणसांच्या आश्रयात गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र जागतिकीकरण आणि शहरीकरणाच्या दुष्परिणामांतून निर्माण झालेल्या अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंश.
एकीकडे आडव्या-उभ्या पद्धतीने बेसुमार वाढणाऱ्या शहरातील कचºयाच्या ढिगाºयांवर श्वानांची संख्या अनियंत्रितरीत्या वाढत गेली, तर दुसरीकडे जागतिकीकरणामुळे हाती पैसा खुळखुळू लागलेल्या नवश्रीमंत वर्गात परदेशी कुत्री पाळायची फॅशन आल्याने स्थानिक प्रजातीच्या कुत्र्यांचा लोकाश्रय नष्ट झाला. त्यामुळे आपल्या शहरात प्रथमच भटकी कुत्री हा प्रकार अस्तित्वात आला. आतापर्यंत आपल्या परिसरात असणारे श्वान हे घराबाहेर राहत असले तरीही घरच्या सदस्यांप्रमाणे होते.
उघड्या कचरापेट्यांतून होणाºया मुबलक अन्नपुरवठ्यामुळे श्वानांची प्रमाणाबाहेर वाढलेली संख्या आणि देशी श्वानांचा नष्ट झालेला लोकाश्रय हेच या समस्येचे मूळ आहे. त्याचबरोबर वाढत्या श्वानसंख्येला नियंत्रित करण्यासाठी योजलेल्या निर्बीजीकरण मोहिमेचे फलस्वरूप म्हणून श्वानदंशाचे प्रमाण आणखी वाढल्याचे अभ्यास सांगतो. श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांच्या पिलांचेही सरसकट निर्बीजीकरण करण्यात आल्याने जरी श्वानाच्या संख्यावाढीला आळा बसला असला तरीही प्रजनन करण्यात अपयश येत असल्याने श्वानांत दिवसेंदिवस आक्रमकपणा वाढत चालला आहे.
प्रजननाचा मूलभूत अधिकार श्वानांकडून हिरावून घेतला गेल्यानेही श्वानदंशाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. सरसकट कुत्र्याचे असे निर्बीजीकरण करण्यात येत असून, निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला दिलेला हा हक्क हिरावून घेण्याचा हक्क कुणालाही नाही.
काही दिवसांपूर्वी दहिसर पश्चिमेला ‘बिबट्या वाघ दत्तक कार्यक्रम’ असे ठळकपणे रंगवलेली एक मोठी भिंत पाहिली. एका राजकीय पक्षाचा हा उपक्रम आहे, असे वाचून कळले. बिबट्या दत्तक घेणार म्हणजे नक्की काय करणार ते कळले नाही. ते वाघाला घरी आणणार की जंगलात जाऊन त्याला खायला देणार हे काही कळले नाही. कल्पना चांगली आहे. हाच उपक्रम कोणी भटक्या देशी श्वानांच्या बाबत राबवायला हवा, अशी ती जाहिरात वाचून वाटले. तरच
देशी श्वानांचा प्रश्न सुटण्यास मदत
होईल.
श्वानांची समस्या सोडविण्यासाठी करता येतील अशा ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. श्वानप्रेमींनी स्थानिक श्वानांना दत्तक घेतल्यास श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यास मोठा हातभार लागू शकतो. प्रत्येक श्वानास किमान एकदा यशस्वी प्रजनन करू देणे. निर्बीजीकरण मोहीम योग्यप्रकारे राबविणे. लोकसंख्येच्या प्रमाणात श्वानांची संख्या जास्त असल्यास श्वानगृहांची निर्मिती करणे; याचा सातत्याने विचार करण्याची गरज आता आहे.

(लेखक हे ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मुख्य संरक्षक आहेत.)

Web Title:  What happened as 'stray' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा