मराठी तरुणाईची जागतिक झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:03 AM2018-04-01T00:03:24+5:302018-04-01T00:03:24+5:30
मागील काही वर्षांपासून जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण बदल, नवनवीन संकल्पना समोर आलेल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आपण पाहतच आहोत. भारतही याबाबतीत मागे नाही, यासंदर्भात भारतातूनही खूप नावे पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळतात.
- विकास काळे
मागील काही वर्षांपासून जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण बदल, नवनवीन संकल्पना समोर आलेल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आपण पाहतच आहोत. भारतही याबाबतीत मागे नाही, यासंदर्भात भारतातूनही खूप नावे पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच अक्षरशिल्प एज्युकेशन प्रा. लि. ही एक संस्था. अबॅकस क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले एक मराठी नाव. आमची कुठेही शाखा नाही म्हणण्यापेक्षा, आमची शाखा नाही असे ठिकाण नाही या ब्रीदवाक्यावर ठाम असलेली एक संस्था.
अक्षरशिल्पची स्थापना २०१२ मध्ये आबाजी काळे यांनी केली. गणिताची विशेष आवड असणारे काळे सर स्वत: काही काळ गणिताचे शिक्षक होते. सुरुवातीच्या काळात अक्षरशिल्पने मुलांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी अक्षर सुलेखन हा उपक्रम हाती घेतला. १५ दिवसांत मुलांचे हस्ताक्षर सुधारण्याची किमया अक्षरशिल्पने करून दाखविली. जवळपास २० हजारपेक्षा जास्त मुलांना या उपक्रमाचा फायदा करून दिला आहे. खूप कमी कालावधीत अक्षरशिल्पला मिळालेल्या यशानंतर अबॅकस ही एक वेगळी संकल्पना सुरू केली. त्यापाठोपाठ वैदिक गणित ही संकल्पनाही सुरू केली. पुढील एका वर्षात अक्षरशिल्पचे जाळे महाराष्ट्रात वेगात पसरायला सुरुवात झाली. १०० पेक्षा जास्त लोक अक्षरशिल्पला जोडले गेले. या सर्व कार्यात स्वत: शिक्षिका असणाऱ्या शिल्पा काळे व मार्केटिंगचे तंत्र अवगत असणारे विकास काळे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते.
विशेष बाब म्हणजे अक्षरशिल्पची सुरुवात महाराष्ट्रात होऊन त्याचा प्रसार जगभर झाला. पामा ग्लोबल अबॅकस मेंटल अरिथमेटिक असोसिएशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे भारतातील प्रतिनिधित्व अक्षरशिल्पचे संस्थापक आबाजी काळे यांच्याकडे आले. याआधी अबॅकस क्षेत्रात दक्षिणेकडील संस्थेचे प्रभुत्व होते. एक काळ असा होता की राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेसाठी मुलांना दक्षिण भारतात जावे लागत होते. २६ जानेवारी २०१८ रोजी पामा इंडिया व अक्षरशिल्प एज्युकेशन यांची संयुक्त राष्ट्रीय स्पर्धा नेरूळ नवी मुंबई, महाराष्ट्र येथे पार पडली. यासाठी चेन्नई, आसाम, ओरिसा, गुजरात, राजस्थान या राज्यांतील मुलांनी विशेष सहभाग घेतला होता. याच स्पर्धेमधून या वर्षी मलेशियात होणाºया १८व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मागील काही वर्षांपासून अक्षरशिल्पचे जाळे महाराष्ट्राच्या बाहेरही पसरायला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओरिसा, चेन्नई या राज्यांत अक्षरशिल्पने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेबरोबर आपल्या भारतीय मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची संधी अक्षरशिल्प ने उपलब्ध करून दिली आहे. २८ डिसेंबर २०१६ रोजी सेउल साउथ कोरिया येथे झालेल्या १६ व्या
पामा ग्लोबल आंतरराष्ट्रीय अबॅकस मेंटल अरिथमेटिक स्पर्धेमध्ये ११ भारतीय मुलांना भरघोस यश मिळाले. याचीच पुनरावृत्ती २८ डिसेंबर २०१७ रोजी जोहान्सबर्ग, साउथ आफ्रिका येथे झालेल्या १७ व्या पामा ग्लोबल आंतरराष्ट्रीय अबॅकस मेंटल अरिथमेटिक स्पर्धेमध्ये पाहावयास मिळाली. या वेळी १७ मुलांना यश प्राप्त झाले. सलग दोन वर्षे मिळालेल्या यशामुळे भारताने पामा ग्लोबलमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुढील ३ ते ४ वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळण्याची आशा आहे. ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब असेल.
अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आकलनशक्ती, सृजनशीलता अभ्यासातील वेग अचूकता वाढते. ग्रामीण भागात मुबलक शुल्क व भाषा हा मूळ अडसर होता. याला पर्याय म्हणून हा अभ्यासक्रम ग्रामीण भागातील शालेय उपक्रमात समाविष्ट करून, अक्षरशिल्पने सिद्ध केले की, हे तंत्र फक्त शहरी भागापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही हे तंत्र अवगत करण्याचा अधिकार आहे. एवढेच करून न थांबता हा अभ्यासक्रम मराठी माध्यमांच्या शाळांमध्येसुद्धा राबविला जात आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर काम करत असताना, हे तंत्र भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे व भारतातील तरुण-तरुणी व महिलावर्ग यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने भारतभर याचे प्रतिनिधी / सेंटर नेमण्याचा उपक्रम सुरू केला गेला आहे.