संसार करावा नेटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:02 AM2018-02-11T01:02:03+5:302018-02-11T01:02:22+5:30
गेली १३ वर्षे एका कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांना असंख्य कुटुंबांतील नवरा-बायकोच्या नात्याचे बंध जवळून पाहता आले.
- आदेश बांदेकर
गेली १३ वर्षे एका कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांना असंख्य कुटुंबांतील नवरा-बायकोच्या नात्याचे बंध जवळून पाहता आले. लग्नसंस्था घट्ट असण्यामागे अनेक कारणे असतात. दोघांच्या नात्यात अनेक टप्पे येतात. त्या टप्प्यांवरून जात नाते फुलवता येते.
पती - पत्नीच्या नात्यात एकमेकांना सन्मान दिलाच पाहिजे. तिचाही सन्मान जपला पाहिजे. या गोष्टी जपल्या की संसार नेटका होतो. त्याला फाटे फुटत नाहीत. यामुळेच आपली विवाहसंस्था मला युनीक वाटते. ती एका संस्कारामध्ये बांधली गेली आहे. तिला आध्यात्मिक बैठक आहे. स्वत:पेक्षा दुसºयाचं यश चिंतणं, त्याचबरोबर कुटुंबाचा विचार करणं या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गुण-दोष दोघांमध्ये असतात. पण दोषांकडे कमी लक्ष देऊन गुणांवर अधिक लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच फरक पडतो. पैशापेक्षा माणूसपणावर संसार टिकतातच. त्यात आनंद असतो.
मी गेली अनेक वर्षे एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या घराघरांत फिरलो. खूप संसार पाहता आले, अनुभवता आले. या कार्यक्रमामुळे अनेकांचे संसार घट्ट झाले. तिला ‘तो’ त्याला ‘ती’ नव्याने समजली. एक घर माझ्या कायमचं स्मरणात राहिलं आहे. प्रभादेवी येथे राहणारं हे कुटुंब. नवरा तेव्हा स्मशानात नोकरी करायचा आणि बायको धुणी-भांडी करते. त्यांचं लव्ह मेरेज. तेव्हा बाहेर कुणी पाहू नये म्हणून ते स्मशानातच भेटायचे. यांच्या नात्यात महत्त्वाचा ठरला तो विश्वास. त्याच्या आता २ बायपास झालेल्या आहेत. पण त्यांचा संसार घट्ट आहे. अशी अनेक छोट्या आनंदात सुख मानणारी कुटुंबे पाहायला मिळाली. हे सगळं आलं कुठून असेल तर विश्वासावरच ना!
दोघांनी एकमेकांचा प्रचंड आदर करणं हे नवरा-बायकोच्या नात्याचं मुख्य सूत्र आहे. स्वाभिमानाला ठेच न पोहोचवणं, एकमेकांना गृहीत न धरता संवाद साधणं हे कौशल्य नवरा-बायकोला साधता यायला हवं. संवादातही प्रचंड सातत्य राखणं गरजेचं आहे. संवाद अगदी क्लियर हवा. घरात आर्थिक श्रीमंती नसली तरी मनाच्या श्रीमंतीवर, घराच्या स्वच्छतेवरून, आचरणावरून ते घर कसं आहे ते कळतं.
आजकाल एकत्र कुटुंबात राहायचं की नाही यावरूनही अनेक चर्चा घडतात. त्यावर असं वाटतं की, विवाहसंस्थेत कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते. कुटुंबानेही दोघांसाठी कायम सुयश चिंतले पाहिजे. असूया दिसू नये. उलट तिच्या आनंदात जे कुटुंब तितक्याच आनंदानं किंवा ती जेव्हा रडते तेव्हा घरातल्यांनाही रडू येतं तिथं घरातल्या सर्वांचं नातं घट्ट आहे असं समजावं. हे ज्या-ज्या घरात घडतं त्या-त्या घरात घटस्फोटाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. जिथं समाधानाचं प्रमाण जास्त तिथं तडजोड आली आणि ती दोन्ही बाजूंनी करावीच लागते. ईर्षा आली की समस्या सुरू होतात. एकमेकांना सांभाळून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते.
सुचित्रा तुला थँक्स म्हणायचंय!
यानिमित्ताने मला सुचित्राला धन्यवाद द्यायचे आहेत. तू आदेशमधल्या माणसावर प्रेम केलंस. तुझ्यामुळेच आलेली आव्हानं हसत हसत पेलू शकलो. त्याहीपलीकडे माझ्यापेक्षा लहान असूनही कायम तू मोठी असल्याप्रमाणे माझ्यापाठी खंबीर उभी राहिलीस. २७ वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं, माझ्यावर विश्वास ठेवून तू स्वत:चं घर सोडून आलीस. त्या क्षणाचा कधी तुला पश्चात्ताप होऊ देणार नाही. माझ्या वागण्यातून, आचरणातून असं कार्य घडेल की तुला कायम माझा अभिमान वाटेल आणि कायम तुझी मान अभिमानाने उंचावेल. खरंच मी भाग्यवान आहे तू माझ्या आयुष्यात आलीस. थँक्स सुचित्रा!
(शब्दांकन - भक्ती सोमण)