बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:00 AM2018-02-20T01:00:01+5:302018-02-20T01:00:25+5:30

संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या मुली कमी नाहीत, हे पाहूनही विरोध न करता सहकार्य करत असलेल्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातही हेच चित्र दिसत आहे

Child marriage | बालविवाह

बालविवाह

लक्ष्मी मुकादम
बालविवाहाची समस्या आजही आपल्यातून गेलेली नाही, याचे अनेक छोटेमोठे परिणाम आजही समाजाला भोगावे लागत आहेत. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या मुली कमी नाहीत, हे पाहूनही विरोध न करता सहकार्य करत असलेल्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातही हेच चित्र दिसत आहे. सद्य:स्थितीमध्ये ग्रामीण भागातील लहान मुलेमुली लग्न करतात आणि शहरात येऊन राहतात. अशी लग्न झालेली व वयाने कमी असलेली मुले व मुली समतोलच्या संपर्कात येतच असतात. त्यातील आमचा हा एक अनुभव.


दिनांक १४ नोव्हेंबरला पुणे रेल्वेस्टेशनवर मी आणि समतोलचीच कार्यकर्ती रेखा गायकवाड बाल दिन साजरा करण्यासाठी स्टेशनवरच्या मुलांबरोबर गप्पा मारत उभे होतो. अचानक एक नजर एका मुलीवर पडली. आम्ही जाऊन त्या मुलीची चौकशी केली असता स्टेशनवर ती दानापूर येथे जायचे आहे व सोबत नवरा आहे, असे मुलीने सांगितले. मुलीचे वय १४ वर्षे दिसत होते व आम्हाला थोडा संशय आला म्हणून आम्ही मुलीच्या समोरच्या जनरल वेटिंग हॉलमध्ये तिच्यावर नजर ठेवून बसलो.
सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ती मुलगी एकटीच एका ठिकाणी बसली होती. मग, आम्ही परत जाऊन तिची चौकशी केली असता तिला मदतीची गरज आहे, असे आमच्या लक्षात आले. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून माहिती घेऊ लागलो. तेव्हा तिच्याकडून आम्हाला असे कळले की, ती कल्पना (काल्पनिक नावं) ही मुंबई पवईतील शांतीनगर येथे राहणारी आहे. मुलीने तिच्या आईवडिलांबद्दल जास्त न सांगता माझे लग्न झाले आहे. नवरा मला खूप मारहाण करतो व खूप काम करावे लागते, म्हणून ती दीड महिन्यापूर्वी घरातून न सांगता निघाली व पुणे स्टेशनला आली होती. दरम्यान, पुण्यात स्टेशनवर राहणाºया एका महिलेने तिला आपल्या विश्वासात घेऊन गेली व दोन दिवसांनंतर तिने काही पैशांसाठी त्या मुलीचे एका अनोळखी माणसासोबत लग्न लावून तिला विकले. कदाचित, त्या महिलेने अशा प्रकारे अनेक मुलींसोबत केले असावे. कल्पनाकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर मुलीला काळजी व संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला नेले. त्यावेळी रात्रीचे १० वाजले होते. पोलीस स्टेशनला आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. मुलीला बालगृहात दाखल करण्यासाठी आम्ही संस्था म्हणून पत्रव्यवहार केला असता ही मुलगी आमच्या ताब्यात आहे, तुम्ही येथून निघून जा, अशी उलटसुलट उत्तरं पोलिसांकडून ऐकायला मिळाली. मुलगी येथेही सुरिक्षत नाही, असे आम्हाला वाटू लागले. त्या मुलीसोबत आम्ही पोलीस स्टेशनला थांबून राहिलो. त्यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. कल्पनाबद्दल पोलिसांना संवेदना वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला जेवायला विचारले नाही. गुन्हेगार आहोत, असे ते आमच्याशी वागत होते.
मुलीला आम्हीच बाहेरून जेवण आणून दिले. कायद्याने कोणत्याही मुलीला वा मुलाला ६ नंतर पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही. तरीसुद्धा, कल्पनाला आम्ही चौकशी करतोय, असे सांगून रात्रभर पोलीस स्टेशनलाच ठेवले. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये संगणक चालवणारी एक महिला व दोन शिपाई व एक सहायक होते.
दरम्यान, मुलीच्या घरच्यांचा शोध लागण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरूच केले होते. पवई पोलीस स्टेशनला आम्ही फोन करून या मुलीबद्दल माहिती दिली असता समजले की, त्या मुलीबद्दलची माहिती त्या पोलीस स्टेशनला होती. मुंबईतील पवई पोलिसांनी त्यांची माहिती देऊन आम्हाला सहकार्य केले. थोड्या वेळाने मुलीच्या आईचा आम्हाला फोन आला. आम्ही त्यांना सगळी माहिती देऊन ताबडतोब पुण्याला बोलावून घेतले.
समतोल संस्थेच्या अशा अनेक विषयांवर कार्य सुरूच आहे. या कामासाठी संबंधित असणारे विभाग म्हणजे महिला बालकल्याण विभाग, रेल्वे शहरी पोलीस यंत्रणा, हॉस्पिटल, शैक्षणिक विभाग, शाळा, कॉलेज व त्याचबरोबर बालगृह व बालनिरीक्षणगृह, बालकामगार आयुक्तालय, बालविवाह प्रतिबंधक विभाग या सर्वांना मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे, असे लक्षात येते. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याविषयीच्या जनजागृतीसाठी महाराष्टÑ राज्याचा बालहक्क संरक्षण आयोग व समतोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या स्तरांवर चर्चासत्र सुरू केलेले आहे. या चर्चासत्रातून अनेक लहान मुलामुली जे अत्याचाराला बळी पडले आहेत, ते समोर आले आहे.
कल्पनाचे आईवडील जी गाडी मिळाली, ती पकडून पुण्यास आले होते. पोलीस स्टेशनमध्येच मुलीच्या आईवडिलांची तपशीलवार माहिती घेऊन मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. एका मुलीचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून नवीन जीवन देण्याचा आनंद समतोलच्या टीमला नेहमीच येत असतो. जर पोलीस यंत्रणेने अधिक सहकार्य केले असते, तर मुलीवर अत्याचार करणाºयांना शिक्षा करता आली असती, एवढी एक सल मात्र अद्याप कायम आहे.

foundationsamatol@gmail.com 

Web Title: Child marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.