बेकायदा चाळींच्या विळख्यात अडकले कोपर, केडीएमसीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:05 AM2017-12-04T00:05:31+5:302017-12-04T00:05:40+5:30
अगदी कालपरवापर्यंत ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा कोपर परिसर आज टोलेजंग इमारतींनी व्यापून गेला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात असूनही हव्या तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने
अनिकेत घमंडी, डोंबिवली
अगदी कालपरवापर्यंत ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा कोपर परिसर आज टोलेजंग इमारतींनी व्यापून गेला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात असूनही हव्या तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने कोप-यात वसलेल्या कोपरकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
डोंबिवलीला खेटून असलेल्या कोपर परिसराकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने तेथे विकासच झालेला दिसत नाही. एकेकाळी कोपरमध्ये राहण्यासाठी जाणे फारसे सुरक्षित नव्हते. पण, आज वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरातही इमारतींचे इमले उभे राहू लागले आहेत. इमारती उत्तुंग झाल्या, पण कोपरचे रूपडे काही पालटले नाही. तो परिसर आजही पूर्वीइतकाच उपेक्षित आहे. त्या परिसरात पालिकेकडून सुविधा पोचलेल्या नाहीत.
आधी अप्पर कोपर स्थानक होते. नंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर स्टेशन झाल्यापासून तेथील लोकसंख्येत वाढ झाली. अन्यथा, डोंबिवलीत उतरून रिक्षाने कोपरला जावे लागायचे. कोपर पश्चिमेला झोपड्यांची संख्या अधिक असून अनेक वर्षे ही मंडळी येथे वास्तव्य करत असल्याने नकळत ही मंडळी आपला हक्क सांगू लागली आहेत. कोपर पूर्वेला भूमाफियांच्या कृपेने आणि केडीएमसीच्या दुर्लक्षतेमुळे रातोरात चाळी उभारल्या जाऊ लागल्या. कमी पैशांत घर मिळत असल्याने नागरिकांचा ओढा येथे वाढत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह, घरातच छोटेखानी किचन, बाथरूम असे या घरांचे स्वरूप आहे. मुळात या चाळी रेल्वेमार्गाजवळ उभारल्या जात असल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
पूर्वेला दलदलीचा भाग म्हणून बफर झोन, तर पश्चिमेला मोकळी जागा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेला असूनही सीआरझेडमुळे येथे विकास करता येत नाही. बहुतांश ठिकाणी जमिनीखाली अवघ्या काही फुटांवर मुरूम (दगड) असल्याने आणि पाणी जमिनीत मुरत नसल्याने मोठी समस्या आहे. त्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठाकुर्लीसह सोनारपाडा, दावडी, गोळवली, संपूर्ण एमआयडीसी, श्रीमलंग पट्टा आणि डोंबिवलीतील पाणी या भागात येते. खाडीत पाणी जाईपर्यंत येथील सखल भागात पाणी जमा होत असल्याने दलदल होते. परिणामी, हा भाग दलदलीचा असल्याने बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरीकरणामुळे येथील शेतीही आता नामशेष होत चालली आहे.
कोपरमध्ये ४० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. पूर्वी येथे घनदाट जंगल होते. उदरनिर्वाहासाठी शेती हाच व्यवसाय होता. पण, कालांतराने येथील युवकांनीही शिक्षणाची कास धरली. तरुण नोकरी, व्यवसायानिमित्ताने इतरत्र जाऊ लागले. काही जण उच्चशिक्षण घेऊन परदेशीही गेल्याचे सांगण्यात आले. कोपर गावामध्ये अद्यापही एक झेडपीसह अन्य एक शाळा आहे. आता कुठे एक कनिष्ठ महाविद्यालय झाले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी डोंबिवली, कल्याण, ठाणे येथे जावे लागते. शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भता येण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
कल्याण, डोंबिवलीत ज्याप्रमाणे रस्त्यांचा विकास झाला, त्या तुलनेत येथे तो झालेला नाही. रस्ते मोठे करायचे, तर कोणी जागा देण्यासाठी पुढे येत नाही. यामुळेही पालिकेला विकास करता येत नाही. रेल्वेच्या मार्गाखालून रस्ता जात असल्याने त्याच्याही विकासावर मर्यादा येतात. अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका जाण्याइतपत रस्ता असायला हवा. मात्र, तसे येथे दिसत नाही. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीनंतर मोठ्या रस्त्यांचा विषय चर्चेला येतो. पण, प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही झालेली नाही. येथील नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी कोपरचा विकास व्हावा, या उद्देशाने स्थानिकांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली आहे.
मध्यंतरी, रस्ते मोठे होण्यासाठी म्हात्रे यांनी पुढाकार घेत त्यांच्या घराची जागा दिली होती. तसे योगदान कमीअधिक प्रमाणात सगळ्यांचे मिळायला हवे, अशी अपेक्षा रहिवाशांमधून आता व्यक्त होत आहे.