अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या शूटिंगसाठी उदयपूरमध्ये आहे. उदयपूरमध्ये राहत असताना अक्षय कुमारने आज आदिवासी मुलांना एक जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. आज तो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सकाळीच कोणालाही न सांगता आदिवासी मुलांना भेटायला पोहोचला. त्यावेळी हॉस्टेलमध्ये आरतीची वेळ होत होती. अचानक तिथे अक्षय कुमारला दिसल्यानंतर मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
उदयपूर जिल्ह्यातील खेरवाडा येथील खोखादरा गावात वनवासी कल्याण परिषदेच्या हॉस्टेलमधील मुलांना अक्षयने हे सरप्राईज दिलं. आदिवासी मुलांसोबत आनंददायी वेळ घालवला. अक्षय कुमारने मुलांसोबत खूप मजा केली. मुलांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांच्यात पूर्णपणे मिसळून गेला. आरतीमध्येही मुलांसोबत सहभागी झाला होता. मुलांनी अक्षय कुमारसोबत सेल्फीही काढला. तसेच सर्व मुलांसोबत ग्रुप फोटोही काढला आहे.
वनवासी कल्याण परिषद हरिओम आश्रम असं या हॉस्टेलचं नाव आहे. अक्षय कुमारने वर्षभरापूर्वी वनवासी कल्याण परिषदेचं हॉस्टेल आणि इमारतीच्या बांधकामात मदत केली होती. त्यामुळे या हॉस्टेलला राजस्थान वनवासी कल्याण परिषद हरिओम आश्रम असं नाव देण्यात आलं.
आता अक्षय कुमारने मुलींच्या हॉस्टेलसाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच मुलींच्या हॉस्टेलसाठी जागेचा शोध सुरू करण्याबाबत त्याने सांगितलं जेणेकरून बांधकाम लवकर सुरू करता येईल. सध्या हॉस्टेलमध्ये 25 मुलं राहतात. अचानक अक्षय कुमारला पाहून कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अक्षय कुमारने येथे बराच वेळ घालवला.