माफी मागतो, पण...! ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:53 PM2020-12-29T14:53:34+5:302020-12-29T14:55:38+5:30
अमिताभ यांच्या कॉलर ट्यूनने अनेकजण वैतागले आहेत. एका अशाच वैतागलेल्या चाहतीने काय करावे तर थेट अमिताभ यांनाच ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल केला.
सध्या कोणालाही कॉल करा, प्रथम अमिताभ यांची कॉलर ट्यून ऐकायला येते. कोरोनाबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो, असे ते या ऑडिओ क्लिपमध्ये सांगतात. उद्देश चांगला आहे. पण अमिताभ यांच्या कॉलर ट्यूनने अनेकजण वैतागले आहेत. ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल अनेक संतापून विचारत आहेत. एका अशाच वैतागलेल्या चाहतीने काय करावे तर थेट अमिताभ यांनाच ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल केला. अमिताभ यांनी यावर काय उत्तर द्यावे, तर त्यांनी चक्क माफी मागितली.
होय, क्षमा त्रिपाठी नावाच्या या चाहतीला कमेंटला उत्तर देताना अमिताभ यांनी माफी मागितली. ‘त्रिपाठीजी, तुमचे आभार. पण ती कॉलर ट्यून माझा निर्णय नाही. कोरोना काळात डब्ल्यूएचओमार्फत एक कॅम्पेन आहे आणि तुम्ही त्याला आवाज द्या, आमही हा व्हिडीओ देशभर दाखवू, असे सरकारकडून मला सांगण्यात आला. आता सरकारने त्याचीच कॉलर ट्यून बनवली. अशात मी काय करणार? मी देशासाठी आणि समाजासाठी जे काही करतो, ते नि:शुल्क करतो. कुठलीही स्क्रिप्ट वगैरे नसते. बस्स, करतो. तुम्हाला या कॉलर ट्यूनचा त्रास होतोय तर मी माफी मागतो. मात्र माझ्या हातात करण्यासारखे काहीही नाही...,’असे अमिताभ यांनी लिहिले.
याआधी सीआरपीएफ जवान असल्याचा दावा करणा-या एकाने या कॉलर ट्यूनबद्दल संताप व्यक्त केला होता. ‘ दिवसभरात जेव्हा केव्हा मी फोन करतो तेव्हा अमिताभ बच्चन हात धुण्याबाबत सांगत असतात. मी त्यामुळे त्रस्त झालो आहे. मला अमिताभ यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही. मला सल्ला देणारे ते कोण? जी व्यक्ती स्वत: कोरोना पॉझिटिव्ह होती, त्या व्यक्तीचा सल्ला मी का मानू? अमिताभ यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यामुळे मला सल्ला देण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. मी त्यांचा आवाज ऐकून वैतागलो आहे. मी हायकमांडपर्यंत ही गोष्ट नेऊ इच्छितो. तुम्ही हा प्रकार बंद केला पाहिजे. आम्ही त्यांचे म्हणणे का ऐकायचे?’अशी या जवानाची ही आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती.
तुम्हाला ठाऊक आहेच की, अमिताभ स्वत: शिवाय त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या व नात आराध्या हे सगळे कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. अमिताभ यांनी 11 जुलैला ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.