प्रगत तंत्रज्ञानामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंजली पाटील हिची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मुंबई पोलीस असल्याचं सांगून अभिनेत्रीला 5.79 लाखांचा गंडा घातला आहे. तैवानमधून येणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचं सांगून अंजली पाटीलला फसवण्यात आलं. गेल्या आठवड्यात ही घटना घडली जेव्हा अंजलीला एका व्यक्तीचा फोन आला ज्याने दावा केला होता की तिचं बँक अकाऊंट हे मनी लाँड्रिंगशी जोडलेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी अभिनेत्रीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोनवरील व्यक्तीने सांगितलं की त्याचं नाव दीपक शर्मा असून तो FedEx कुरिअर कंपनीतून बोलत आहे. दीपकने अंजलीला सांगितलं की, तिच्या नावाने तैवानच्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलं असून, ते कस्टम विभागाने जप्त केलं आहे. पार्सलमध्ये अभिनेत्रीचं आधार कार्डही सापडले असल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत तिने तातडीने मुंबई सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून तिच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये.
आधी ड्रग्ज, मग मनी लाँड्रिंगची धमकी
बॅनर्जी नावाच्या एका व्यक्तीने आपण मुंबई पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि त्याने त्यानंतर लगेचच स्काईपवर अंजलीला व्हिडीओ कॉल केला. या व्यक्तीने अंजलीला सांगितलं की तिचे आधार कार्ड तीन बँक खात्यांशी लिंक आहे जे मनी लाँड्रिंगशी जोडलेले आहेत. या व्हेरिफिकेशनसाठी अभिनेत्रीकडून 96,525 रुपये प्रोसेसिंग फी मागितली होती. यानंतर अंजलीला एक फोन नंबर पाठवून त्यावर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले.
बॅनर्जी नावाच्या याच व्यक्तीने सांगितलं की, या प्रकरणात बँकेचे काही अधिकारीही सहभागी आहेत, त्यांच्याकडून पुन्हा 4,83,291 रुपयांची मागणी करण्यात आली. यासोबतच अंजलीला जर हे प्रकरण इथेच संपवायचे असेल तर तिने हे पैसे द्यावेत असं सांगितलं. बदनामीच्या भीतीने आणि पोलीस केसमध्ये अडकण्याच्या भीतीने अंजलीने हे पैसे जमा केले.
काही दिवसांनंतर अंजलीने हा सर्व प्रकार घरमालकाला सांगितला आणि त्यानंतर तिला समजले की ती सायबर फ्रॉडची शिकार झाली आहे. अंजलीने दिलेल्या माहितीनंतर डीएन नगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अभिनेत्री अंजली पाटीलने 'न्यूटन', 'चक्रव्यू', 'मेरी निम्मो', 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' आणि 'द सायलेन्स' सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.