निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक खुलासे त्यांनी यामध्ये केले आहेत. तसंच त्यांचा आगामी 'मैदान' सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना श्रीदेवी (Sridevi) यांच्यावरील बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं वाचा.
श्रीदेवी या भारतीय सिनेसृष्टीतील दिग्ग्ज अभिनेत्री होत्या. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहते जगभरात होते. 'चांदनी', 'रुप की रानी चोरो का राजा', 'मिस्टर इंडिया', 'चालबाज', 'इंग्लिश विंग्लिश' असे एकापेक्षा एक दमदार चित्रपट त्यांनी दिलेत. अशा अभिनेत्रीवर बायोपिक यावा असं सगळ्यांनाच वाटतं. पण बोनी कपूर यावर म्हणाले, "श्रीदेवी खूपच खाजगी आयुष्य खाजगीच ठेवणारी होती. त्यामुळे तिचं आयुष्य खाजगीच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तिच्यावर बायोपिक येईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत तर मी हे होऊ देणार नाही."
श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी 2018 साली दुबईत अकस्मात निधन झालं. बाथटबमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. यानंतर त्यांचं पार्थिव भारतात आणलं गेलं. त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या अंतिमदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता.
बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत 1996 साली श्रीदेवीशी लग्न केले होते. त्यांना जान्हवी आणि खुशी कपूर या मुली झाल्या.श्रीदेवीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळण आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये काम केलं. 2013 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.