Join us

झीनत अमान यांनी जागवल्या देव आनंद यांच्या स्मृती; राकेश बेदींनी केली मिमिक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:55 PM

१००० 'देव'भक्तांच्या उपस्थितीत रंगला जन्मशताब्दी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - सदाबहार अभिनेते देव आनंद यांची जन्मशताब्दी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला देव आनंद यांचे देशभरातून १००० चाहते उपस्थित होते.

देव आनंद यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त वरळीतील ब्लूम हॅाटेलमध्ये केक कापण्यात आला. नेहरू सेंटरमध्ये सायंकाळी देव आनंद जन्मशताब्दी सोहळा व संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला देव आनंद यांच्या १००० चाहत्यांनी हजेरी लावली. यात ३०० चाहते देशाच्या विविध भागांमधून आले होते. झीनत अमान, राकेश बेदी आणि सिनेमॅटोग्राफर अदिप टंडन यांच्या मुख्य उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन केल्यानंतर क्लॅप देऊन फिल्मी स्टाईलनमेही कार्यक्रमाला सुरुवात केली. विविध भरतीचे युनूस खान यांनी झीनत अमान यांनी मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना झीनत म्हणाल्या की, मी भारतातून बाहेर जाणार होते. त्यावेळी देवसाहेबांनी मला बोलावून 'हरे रामा हरे कृष्णा' सिनेमाच्या स्क्रीन टेस्टसाठी बोलावले. सिनेमॅटोग्राफरना माझे डोळे आणि हास्य खूप आवडल्याने त्यांनी मला 'हरे रामा हरे कृष्णा'साठी साइन केल्याचे फोन करून सांगितले. ते खूप समजावून सांगायचे. ते खूप स्टायलिश होते. त्यांना पाहून शिकणे खूप इंटरेस्टिंग होते. हेअर ड्रेसर आणि डान्स दिग्दर्शक यांचा त्यांना राग यायचा. आपल्या नॅचरल रिदमवर डान्स करा असे ते असं सांगायचे. सात सिनेमांमध्ये ते माझे नायक होते, पण कधीच रागावले नाहीत. ते कधीच कोणाच्या कामात व्यत्यय आणत नसायचे. देव यांची एनर्जी अफलातून होती. त्यामुळे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही असेही त्या म्हणाल्या. या सोहळ्यासाठी मुंबईबाहेरून आलेल्या चाहत्यांनी देव आनंद यांचा बंगला तसेच स्टुडिओला भेट दिली. राकेश बेदी यांनी देव आनंद यांची मिमिक्री करत त्यांच्या आठवणी जागवल्या.

जयपूरमध्ये हेमा मालिनी...जयपूर देव आनंद महोत्सवाच्या वतीने जयपूरमधील राजमहल सिनेमागृहात तीन दिवसांचा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हजेरी लावली.

टॅग्स :देव आनंद