नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे “जॅकी” आणि “जग्गू दादा” नाव, तसेच आवाज व प्रतिमा परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूंसाठी वापरण्यापासून विविध संस्थांना प्रतिबंधित केले आहे. जॅकी श्रॉफ यांनी, फायद्यासाठी अनेक संस्थांद्वारे त्यांच्या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विनापरवाना वापरकेल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी बुधवारी (दि.१५ मे) दिलेल्या अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, श्रॉफ एक प्रसिद्ध कलाकार आहेत. हा दर्जा नैसर्गिकरीत्या त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि संबंधित वैशिष्ट्यांवर काही अधिकार प्रदान करतो. जर सध्या मनाई हुकूम मंजूर केला गेला नाही, तर यामुळे फिर्यादीचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.