मोठ्यांची दुखणी मोठी, असे आपल्याकडे म्हटले जाते. बॉलिवूड सिने तारकांकडे पाहिले की आपल्याला त्यांच्या ऐषोआरामी जीवनाचे कुतूहल वाटते, मात्र आरोग्याच्या बाबतीत त्यांच्या समस्या ऐकल्या तरी आपला विश्वास बसणार नाही, एवढी दुखणी त्यांच्या मागे लागलेली असतात. याला कारण असतात त्यांच्या कामाच्या, पार्टीच्या, झोपेच्या चुकीच्या वेळा, सकस जेवणाची कमतरता आणि व्यसनांची लागण यामुळे ते पडद्यावर कितीही आकर्षक दिसत असले तरी वास्तवात ते रोगट जीवन जगत असल्याचे आढळून येते. ही बाब सिने विश्वापुरती मर्यादित नाही तर अलीकडे सर्व स्तरातल्या तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. याबाबत एका कार्यक्रमात अक्षय कुमारने तरुणांची कानउघडणी केली आणि सुदृढ आरोग्याचा कानमंत्रही दिला.
वयाच्या ५५ व्या वर्षीसुद्धा अक्षय कुमार स्वतःचा फिटनेस राखून आहे. तो सांगतो, 'पार्ट्या वाईट असतात असे मी म्हणणार नाही, पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो हे नक्की! मला जागरणाची सवय नाही, मी रात्री ९.३० ला झोपतो, पहाटे ४ला उठतो. आजवर मी एकही दिवस सूर्योदय पाहणं चुकवले नाही. दिवसाच्या सुरुवातीला योगाभ्यास, झुंबा, सायकलिंग, जिम असे विविध पर्याय निवडल्याने दिवसाची सुरुवात मस्त होते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो.''
''माझ्या मते, दिवसभरातील २४ तासांपैकी १ तास तरी प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे. फिटनेसकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तो उपभोगायला चांगलं आरोग्यही पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आधी तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. मी स्वतः हा नियम कटाक्षाने पाळतो.''
म्हणूनच की काय, तो आजही तरुण दिसतो. बॉलिवूडमधल्या नवनवीन नायिकांचा हिरो म्हणूनही शोभून दिसतो. तो व्यसनांपासूनही दूर राहतो, आहारात पथ्य पाणी सांभाळतो आणि विशेष म्हणजे रोजच्या व्यायामाला महत्त्व देतो.
राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला, राजू कौशल, नवीन निश्चल या कलाकारांचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला, तर सैफ अली खान, सुश्मिता सेन, सुनील ग्रोव्हर या कलाकारांनाही हृदय विकार होऊन गेला. अशातच श्रेयस तळपदे याच्या अँजिओप्लास्टीची बातमी आल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं किती महत्त्वाचं आहे ते परत एकदा अधोरेखित झालं.
या धर्तीवर अक्षय कुमारने सांगितल्या तशा साध्या सोप्या गोष्टी आपल्यालाही फॉलो करता येण्यासारख्या आहेत. स्वतःवर घेतलेली मेहनत कायमच उपयोगी पडणारी आहे. यालाच सेल्फ इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. यासाठी उद्यापासून, सोमवारपासून, एक तारखेपासून व्यायाम सुरू करू असे म्हणत थांबू नका, कारण चांगल्या कामासाठी उद्या कधीच उगवत नसतो. शुभस्य शीघ्रम म्हणा आणि अक्षयचा आदर्श ठेवून तंदुरुस्त जीवन जगा.