Pankaj Udhas death reason: चिट्ठी आई है, चांदी जैसा रंग है तेरा, ये दिल्लगी यांसारख्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गझल आणि असंख्य बॉलिवूड गाण्यांचे गायक पंकज उधास यांचे आज निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी पंकज उधास यांनी जगाचा निरोप घेतला. २००६ साली पंकज उधास यांना मानाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगी नायब उधास हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची माहिती दिली. निधनाचे कारण याचे कारण देताना त्यांनी एवढेच लिहिले आहे की, पंकज उधास दीर्घकाळ आजाराने त्रस्त होते.
पंकज उधास यांना कोणता आजार होता?
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंकज उधास कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजेच Pancreatic cancer हा दुर्धर आजार झाला होता. ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी एबीपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चार महिन्यांपूर्वी पॅनक्रिएटीक कॅन्सरचे निदान झाले होते. ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. या दरम्यान, आज त्याचा रूग्णालयात त्यांचे निधन झाले. WHO च्या अहवालानुसार, कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचे एक प्रमुख कारण ठरताना दिसत आहे. 2020 मध्ये कर्करोगामुळे जवळपास 10 दशलक्ष मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आहे.
पंकज उधास यांच्यावर उद्या, २७ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.