Join us

सनी देओल, संतोषी २७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र; 'घातक' कॉम्बिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:10 AM

ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ९० च्या दशकात एकापेक्षा एक दमदार सिनेमे देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि अभिनेता सनी देओल तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’च्या अपयशानंतर ब्रेकवर गेलेला आमिरखानही या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार आहे. १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘घायल’ या चित्रपटासाठी संतोषी आणि सनी एकत्र आले होते. १९९३ मध्ये आलेल्या या जोडीच्या ‘दामिनी’नेही बाॅक्स ऑफिस गाजवले. १९९६ मध्ये ॲक्शन­-थ्रिलर ‘घातक’द्वारे संतोषी-सनीने पुन्हा रसिकांवर आपली जादू केली, पण त्यानंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाहीत. आता २७ वर्षांनी दोघे एकत्र येणार असून, यात आमिर खानही आहे.

आमिर, सनी आणि संतोषी यांचा सध्या या आगामी ॲक्शन-थ्रिलर ड्रामासाठी विविध टायटल्सवर विचारविनिमय सुरू आहे. यंदा डिसेंबरमध्ये किंवा पुढल्या वर्षी जानेवारीत या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची योजना आहे. १९ ऑक्टोबरला सनीच्या ६६ व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. संतोषींचे ते बोलणे सनीला खटकले अन्...धर्मेंद्र यांनी होम प्रोडक्शनमध्ये ‘बरसात’ चित्रपटाद्वारे बाॅबी देओलला लाँच केले. सुरुवातीला ‘बरसात’चे दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते आणि करिष्मा कपूर सिनेमाची नायिका होती. फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये याचा मुहूर्त झाला होता, पण बरेच दिवस चित्रपट सुरू न झाल्याने  बबिताने करिष्माला सिनेमातून बाहेर काढले. नंतर ट्विंकलची एंट्री झाली. शेखर कपूर यांनीही सिनेमा सोडल्याने सनीने संतोषी यांच्याकडे ‘बरसात’च्या दिग्दर्शनाची धुरा सोपवली. पण एका पार्टीत बोलताना मी असल्याने सनी आहे, असे संतोषी म्हणाले होते. त्यामुळे सनीला राग येऊन दोघांमध्ये वितुष्ट आले. 

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडआमिर खान