सोशल मीडियावर बदनामी करणं सहज-सोपं झालं आहे. या माध्यमातून सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातं. त्यातूनच, त्यांचे मॉर्फ फोटो, व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. सेलिब्रिटीच नाही सर्वसामान्य लोकंही या प्रकाराला सामोरे जात आहेत. नुकतंच 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ फेक असून ओरिजिनल व्हिडिओ पोस्ट करत एकाने ट्विचरवरुन याबाबत स्पष्टता केली. आता, केंद्रीय टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही भाष्य केलं आहे.
रिसर्चर अभिषेकने X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. त्यामध्ये ती आनंदाने उड्या मारत लिफ्टमध्ये जाते. त्यात तिला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अभिषेकने लिहिले, 'डीपफेक विरोधात कायदेशीर कारवाई आणि नियम बनवण्याची तात्काळ गरज आहे. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. पण थांबा, ही रश्मिका नाही तर हा झारा पटेल नावाच्या महिलेचा डीपफेक व्हिडिओ आहे. झारा पटेल ही ब्रिटीश-भारतीय मुलगी आहे जिचे इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत. तिने ९ ऑक्टोबरला हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आता, अभिषेकच्या या व्हिडिओवर मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्वच डिजिटल युजर्संची सुरक्षा आणि विश्वास अबाधित ठेवण्यासाठी मोदी सरकार प्रतिबद्ध आहे, असे चंद्रशेखर यांनी म्हटलं. मंत्री महोदयांनी, एप्रिल २०२३ च्या आयटी नियमांचा दाखला देत ही कायदेशीर बाब असल्याचं म्हटलं. याप्रकरणी ३६ तासांत संबंधित पोस्ट प्लॅटफॉर्मवरुन हटविले जाणे आवश्यक आहे. मात्र, तसे न झाल्यास युजर्स आयपीसीच्या कलमान्वये न्यायालयात दाद मागू शकतो. डीपफेक नवीन आणि तितकाच भीतीदायक प्रकार असल्याचंही मंत्री चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
रश्मिक मंदानानेही दिली प्रतिक्रिया
अभिषेकच्या या व्हिडिओवर अमिताभ बच्चन यांनीही कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. ते लिहितात,'खरंच यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.'' तर, रश्मिकानेही यावर प्रतिक्रिया देताना प्रामाणिकपणे सांगते, हे खूपच भयानक असल्याचं म्हटलं. तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जात आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर असुरक्षित वाटणाऱ्या प्रत्येकासाठी, असे रश्मिकाने म्हटलं आहे.
दरम्यान, ती लवकरच रणबीर कपूरसोबत आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.