लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: 'मिशन ओ-२'अंतर्गत प्रोजेक्ट-५ मध्ये शुक्रवारी घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड करण्यात करण्यात आली. घाटपुरी टर्निंगवरील छोटी देवी मंदिर ते घाटपुरीच्या जगदंबा संस्थानपर्यंत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला. मिशन ओ-२ चे प्रकल्प प्रमुख डॉ. कालीदास थानवी यांच्या संकल्पनेतून खामगाव शहरातील विविध भागात वृक्षारोपणाचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये सुरूवातीला नॅशनल हायस्कूल समोर वृक्षारोपण करण्यात आले. पुढील टप्पा म्हणून रावण टेकडी भागात वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर जय किसान खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत घाटपुरीतंर्गत किसन नगर आणि आता प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्यात शुक्रवारी घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय थोंटागे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी साहित्यीक मुक्तेश्वर कुळकर्णी, उद्योजक बिपीन गांधी यांच्यासह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांसह मिशन ओ-२ चे सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
वृक्षसंवर्धनावर भर!लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी फायबरचे ट्री गार्ड बसवण्यात येत आहेत. सोबतच झाडांना काटेरी कुंपनही करण्यात येत आहे. दरम्यान, निसर्गाकडून घेतले आॅक्सीजन म्हणजेच ओ-२ निसर्गाला परत करण्यासाठी मिशन ओ-२ मध्ये सहभागी व्हावे. मिशन ओ-२ अंतर्गत लावण्यात आलेल्या ७०० वृक्षांच्या संगोपनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
अप्पर पोलिस अधीक्षकांची वृक्षांप्रती कृतज्ञता!
वृक्षारोपणाप्रसंगी मिशन- ओ-२ च्या सदस्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासाठी आणलेला हार स्वीकारण्यास अप्पर पोलिस अधिक्षकांनी नम्रपणे नकार दिला. त्यानंतर सदस्यांकडून स्वत:च हार घेवून वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षाला चढविला. त्यांची ही संवेदनशील कृती आणि वृक्षाबद्दलची कृतज्ञता अनेकांना भावली.