बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील १२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये त्यांच्या १४ दिवसांच्या नातीचाही समावेश आहे. त्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचारीही कोरोना बाधित आढळल्यामुळे ११ मार्चपर्यंत त्यांचे जनसंपर्क कार्यालय ही बंद राहणार आहे. स्वत: आमदार संजय गायकवाड हे अधिवेशनासाठी मुंबईत असल्याने ते निगेटिव्ह आहेत. सहा मार्च रोजी त्यांच्या कुटुंबातील १२ जण कोरोना बाधित आढळून आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले. यामध्ये त्यांची पत्नी, सून, १४ दिवसांची नात, दोन्ही पुतणे, वहिनी, भाचे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीस ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून अन्य कुटुंबीय हे विलगीकरणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईपिस्ट व वाहन चालकही कोरोना बाधित आढळून आल्याचे ते म्हणाले. परिणामी ११ मार्चपर्यंत त्यांचे जनसंपर्क कार्यालय बंद राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. १४ दिवसांची नात ही कोरोना बाधित आढळून आल्याने आपणास चिंता वाटते असे आ. गायकवाड म्हणाले.
बुलडाण्या शनिवारी एकाच दिवशी ८३७ जण कोरोना बाधित आढळून आलेले असतानाच हे वृत्तही समोर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत असल्याचे चित्र आहे.