- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़ त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़ त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़ खरीप हंगामास सुरूवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़. जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़.खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़ रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़ अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेत मालाची विक्री करता आली नाही़ त्यामुळे, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़ मात्र,मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़ दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़ गत वर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़ गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेउन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़ यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दीष्ट आहे़ मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़ याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रीया सुरू राहण्याची भिती आहे़ राष्टीय कृत बॅंकामधून पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे़ येत्या काही दिवसात पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़-नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा