पूरग्रस्तांसाठी आज रवाना होणार मदत १३०० क्विंटल धान्य व किराणा पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:14+5:302021-07-29T04:34:14+5:30
कोकणात महापुराचे पाणी गावागावांत आणि गल्लीबोळांत घुसले आणि मोठी हानी झाली. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मदतीचा ...
कोकणात महापुराचे पाणी गावागावांत आणि गल्लीबोळांत घुसले आणि मोठी हानी झाली. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मदतीचा हात म्हणून बुलडाणा शिवसेनेेने पुढाकार घेत त्वरेने हे धान्य पाठविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार ही मदत पाठविण्यात येत आहे. यासंदर्भातील संकल्पना खा. प्रतापराव जाधव यांनी मांडली होती. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेना आ.डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, बळीराम मापारी, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, भास्करराव मोरे यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांनी तथा इतर लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातून हे १३०० क्विंटल धान्य व किराणा गोळा करत ते पाठविण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, २९ जुलै रोजी सकाळी धान्य व किराणा साहित्य असलेला ट्रक कोकणाकडे रवाना होणार आहे.
--आर्थिक मदतीसाठी पुढे यावे--
संकटकाळी मदतीसाठी धावून जाण्याची आपली संस्कृती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रधर्माचे पालन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमेल ती मदत करावी, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हा शिवसेनेच्या वतीने संपर्क साधून शिवसैनिकांच्या वतीने धान्य व किराणा माल जमा करण्यात आला आहे. सोबतच ज्यांना आणखी मदत द्यावयाची आहे, त्यांनीही स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच आर्थिक मदतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे.