बुलडाण्यात १९५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:44+5:302021-04-23T04:36:44+5:30
दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक मेहकर : संचारबंदी व कडक निर्बंधानंतर ही दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक केली जात आहे. गुटखा बंदी असतानाही ...
दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक
मेहकर : संचारबंदी व कडक निर्बंधानंतर ही दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक केली जात आहे. गुटखा बंदी असतानाही सध्या ग्रामीण भागात किराणा दुकान, पानटपरीवर गुटखा अगदी सहज पोहचविला जातो. याप्रकरणी गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था
किनगाव राजा : परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था निर्माण झालेली आहे. वर्गखोल्यांची डागडुजी करण्यात येत नाही. सध्या शाळा बंद असल्याने याकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
ढगाळ वातावरण, ऊन गायब
मोताळा : सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने ऊन गायब झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून बहुतांश भागातील वातावरणात बदल झाला आहे. तापमान कमी झाले आहे. दुपारच्या वेळीही उन्हाचा पारा अत्यंत कमी झाला आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरण धोक्याचे ठरत आहे.
आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव
लोणार : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये मुलभूत सुविधांचा अभाव आहे. याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
वीज बिलात सवलत देण्याची आवश्यकता
धाड : कोरोना विषाणू संसर्गासारख्या संकटाने ग्रासलेल्या सर्वसामान्यांना वीज बिलामध्ये सवलत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. संचारबंदीमुळे पुन्हा दुकाने व इतर कामही बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने वीजबिलात सवलत देणे अपेक्षित असून, त्यासाठी महावितरण विशेष तरतूद करण्याची मागणी वीज ग्राहकांमधून हाेत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा
सिंदखेड राजा : तालुक्यातील रब्बी हंगामात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील गहू, हरभरा, मका, कांदा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची आशा आहे. मात्र आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याकडे दुर्लक्ष
देऊळगाव राजा : अनेक ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरून विजेची होणारी मागणी व पुरवठ्यातही असमतोल पाहता वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी आहे. परंतु, वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
मेहकर: शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, हे रस्ते अरूंद असताना ही दिवसा शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. लोणार वेस परिसरातही दुकानांसमोर वाहने लावली जातात, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय
बुलडाणा : शहरी भागात पाणीपुरवठा नळांना तोट्या नसल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा उपव्यय होत आहे. कित्येक ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्हाही लिकेज आहेत. पाणी पुरवठ्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेकांना वेळेवर पाणी मिळत नाही.
प्रवाशी निवारे समस्यांच्या गर्तेत
डोणगाव : मेहकर ते मालेगाव रोडवरील अनेक ठिकाणी बस थांबे आहेत. बस थांब्याच्या ठिकाणी प्रवाशी निवाऱ्यावर छत नसल्यामुळे प्रवाशी त्रस्त आहेत. परिसरातील अनेक प्रवाशी निवारे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. काही प्रवाशी निवाऱ्यांच्या भोवती अतिक्रमण ही करण्यात आलेले आहे.