- सचिन गाभणे
डोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे याठिकाणच्या प्रवाश्यांना खासगी वाहनांचा अधार घ्यावा लागत आहे. बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १ ते १६ जानेवारी या १५ दिवसात १४२ गावांचा दौरा केला. त्यामध्ये विविध गावाच्या नळयोजना पाणी पुरवठा संबंधित माहिती गोळा करीत असताना इतरही अनेक गावांमध्ये एसटी बस अद्यापर्यंत पोहचली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब असून रस्त्याअभावी २२ गावात आजही एस.टी.बस सुरु नसल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील सावंगी विहिर, सावंगी भगत, जयताळा, शिवपुरी, बदनापूर, चौढी, नांद्रा नजीक वडगाव माळी, नेमनापूर, घुटी, निंबा, मिस्कीन वाडी, गौढाळा, पाचला, रायपूर, पेनटाकळी, दुधा, हिवरा बु., नायगांव देशमुख, घाटनांद्रा, उटी, बालडा, लोणी काळे या गावात एस.टी.बस सुरु नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. तर १० वर्षापासून नायगांव देशमुख या गावाला एसटी येत नसल्याचे गावकºयांनी सांगितले. एसटी बस नसल्याने बाहेरगावी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
खराब रस्त्यांचा परिणाम
एकीकडे प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत खराब रस्ते दुरुस्त करण्याचा गाजावाजा करीत असताना दुसरीकडे मात्र खराब रस्त्यामुळे मेहकर तालुक्यातील २२ गावांना एसटी बसचे सुरू नाहीत. रस्त्याअभावी एसटीबस बंद असल्याचे कारण एसटी महामंडळाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.