कोरोना काळातही गणवेशासाठी ४.२५ कोटी रुपयांचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:38 AM2021-05-11T11:38:48+5:302021-05-11T11:39:08+5:30
Khamgaon News : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना काळातही जिल्ह्याला गणवेशासाठी शासनस्तरावरून चार कोटी २५ लाख १९ हजार ६०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या १४३८ शाळांच्या मुख्याध्यापकांना हा निधी सुपूर्द करण्यात आला. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी जानेवारीमध्ये पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या; मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने २१ फेब्रुवारीपासून परत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले.
यामुळे जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग जेमतेम २० ते २५ दिवसच ऑफलाइन झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता गणवेशासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्या तरी पालकांना सूचना देऊन ठराविक वेळेत गणवेशाच्या रकमेचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना गणवेशापोटी प्रत्येकी ३०० रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
या विद्यार्थ्यांना मिळतो मोफत गणवेश
पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुलींना दरवर्षी शासनातर्फे मोफत गणवेशाचे वितरण करण्यात येते. तर एससी, एसटी व दारिद्र्य रेषेखालील मुलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात येतो.
या सर्व पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेशांचे मोफत वितरण करण्यात येते; मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दोनऐवजी एकाच गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे.
शाळा बंद असल्या तरी दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून उपलब्ध निधी देण्यात आला होता. तालुकास्तरावर पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे हा निधी सोपवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
-उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. बुलडाणा.