नांदुरा : शहरात ३० लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतादरम्यान शहरातील जळगाव (जामोद) रेल्वे गेट जवळ जप्त करण्यात आला.
खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या पथकाने २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतादरम्यान शहरातील जळगाव (जामोद) रेल्वे गेट जवळ नाकाबंदी केली. या दरम्यान एम एच २८बीबी ७२०६ची क्रमांकाचे एक चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आढळला. याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून मोठ्या वाहनासह ४५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एएसपी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी नांदुरा दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, आरोपी कपील राजु मिरेकर (वय २४ वर्षे) रा संजयनगर, जाफ्राबाद रोड देऊळगाव राजा व दीपक नागप्पा काटकर (वय ४५ वर्षे) रा. दिनदयाल नगर, चिखली या दोघांविरुद्ध कलम १८८, २७३, ३२८ तसेच सहकलम अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. या अवैध गुटखा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत.