५२ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आता ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:18 PM2019-06-10T14:18:35+5:302019-06-10T14:18:41+5:30
बुलडाणा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायपालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रुपांतरीत होत आहे.
बुलडाणा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायपालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हा पातळीवर आरोग्य वर्धिनी केंद्र नाव असलेल फलक तयार करून या सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लावून ३१ मे रोजीच यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींना रंगरंगोटी करून त्यांची किरकोळ दुरुस्तीही करण्यात येणार आहे. तसेच केंद्रांच्या भिंतीवर वारली प्रकारची पेंटींगही करण्यात येईल. या व्यतिरिक्त येत्या काळात येथील सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत प्रतीक्षा कक्ष, प्रयोग शाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषध साठवणी भांडार कक्षांचीही प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यवर्धीनी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. सोबतच या केंद्रामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरचीही नियुक्ती केली जामार आहे. या केंद्रातंर्गत १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्यात प्रामुख्याने प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्य सेवा; तसेच लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्य सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन यासह अन्य सुविधांचा समावेश राहणार आहे. योग व आयुर्वेद उपचार पद्धतीचाही यात प्रामुख्याने समावेश राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. या सेवा या केंद्रामध्ये उपब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)