बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ७३ व्हेंटीलेटर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:41 AM2020-07-10T10:41:16+5:302020-07-10T10:41:24+5:30
आरोग्य विभागाने सज्जता वाढवली असून वर्तमान स्थिती जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून अवघ्या ३० दिवसात २७७ कोरोना बाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने सज्जता वाढवली असून वर्तमान स्थिती जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, टाटा ट्रस्टकडूनही दहा व्हेंटीलेटर जिल्ह्यास मिळणार असून तीन व्हेंटीलेटर प्राप्त झाले आहेत. उर्वरित सात यंत्रेही येत्या आठवड्यात जिल्ह्यास मिळणार आहे. जिथे कोरोना संसर्गाच्या प्रारंभी शासकीय रुग्णालयात अवघे तीन व्हेंटीलेटर होते. तेथे शासकीय यंत्रणेकडे ४६ व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत. खासगी डॉक्टरांकडे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या व्हेंटीलेटरपैकी २७ व्हेंटीलेटर हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने सध्या जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.
टाटा ट्रस्टचे उर्वरित सात व्हेंटीलेटर येत्या आठवड्यात जिल्ह्यात येणार असून ते मिळाल्यानंतर तब्बल ८० व्हेंटीलेटर जिल्ह्यात उपलब्ध होतील. त्यामुळे कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही नियंत्रणात आणण्यास अधिक मदत मिळेल. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर हा चार टक्के असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याउपरही दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न होत आहे.
‘एम्स‘चे पथक करणार लवकरच पाहणी
बुलडाणा जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोग शाळा मंजूर करण्यात आली असून त्यासंदर्भातील पाहणीसाठी एम्सचे एक पथक बुलडाण्यात येवून पाहणी करणार आहे. दरम्यान बुलडाण्यातील लॅब प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी महिन्याभरापेक्षाही अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जालन्याच्या लॅबचे काम अंतिम टप्प्यात
जालना जिल्ह्याच्या लॅबचे कामही अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात ही लॅब कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. ही लॅब कार्यान्वीत झाल्यास बुलडाणा जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तेथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोराना चाचण्यांचे अहवाल लवकर मिळून रुग्णांवर उपाचार करणे सोपे होईल.
ट्रूनॅट मशीनचाही प्रस्ताव
कोरोनाच्या चाचण्या अधीक वेगाने होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी ट्रूनॅट मशीनचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यास चाचण्यांचा वेग अधिक वाढले. या मशीनद्वारे एकाच वेळी चार नमुने तपासण्यात येतात. ते प्रयोग शाळेत पाठविण्याचे काम पडत नाही. आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून त्याची प्रशासकीय पातळीवर सध्या कार्यवाही सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.