‘दुर्गम’ भागाला ‘सुगम’ दाखविल्यामुळे ७६ महिला शिक्षिका अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:00 PM2018-06-17T17:00:59+5:302018-06-17T17:00:59+5:30
‘दुर्गम’ भाग ‘सुगम’ दाखवून अनेक महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ७६ महिला शिक्षक अडचणीत आल्या असून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : शिक्षण विभागाने घोषित केलेल्या शासननिर्णयानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘दुर्गम’ गावे असताना बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फक्त २७ गावे ‘दुर्गम’ गावे म्हणून घोषित केली आहेत. याशिवाय ‘दुर्गम’ भाग ‘सुगम’ दाखवून अनेक महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ७६ महिला शिक्षक अडचणीत आल्या असून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. शिक्षण विभागाच्या २७ फेबु्रवारी २०१७ शासननिर्णयान्वये जिल्ह्यातील ‘दुर्गम’ व ‘सुगम’ गावे ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता. त्यांनी संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी शासननिर्णयान्वये दिलेल्या अहवालावरून ‘दुर्गम’ गावांची नावे जाहीर केलीत. शिक्षक बदली प्रक्रियेदरम्यान प्रथम ‘दुर्गम’ गावाची जिल्ह्यातील १६७ गावांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसºयांदा फक्त १९ व तिसºयांदा २७ गावांची यादी जाहीर करून कायम करण्यात आली. त्यात जळगाव जामोद, संग्रामपूर व खामगाव तालुक्यातील ‘दुर्गम’ गावांचा समावेश आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी २०१८ रोजी शिक्षण विभागाच्या शासननिर्णयान्वये ‘दुर्गम’ गावे घोषित करून त्या ठिकाणी महिला शिक्षकांना नियुक्ती न देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यानंतरही ‘दुर्गम’ गावांची सुधारीत यादी घोषित होणे अपेक्षित असताना जुनी यादी कायम ठेवण्यात आली. त्यामुळे ‘दुर्गम’ गावातील अनेक शाळांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना बदली प्रक्रियेचा गोंधळ सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
अनेक महिलांशिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना
जिल्ह्यातील २७ ‘दुर्गम’ गावापेक्षा ‘दुर्गम’ गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक महिला शिक्षक पती नोकरी करीत असलेल्या ठिकाणापेक्षा ३० कि.मी. जास्त अंतरावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका गरोदर महिला शिक्षिकेला सिंदखेड राजा तालुक्यातील ७० कि़मी. अंतरावर असलेल्या बुट्टागाव मिळाले आहे. सदर गाव आडवळणी असून दोन शिक्षकी शाळा आहे. या गावाचा जवळपास आरोग्य केंद्रही नाही. याशिवाय ६८ कि़मी अंतरावर असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसलेले बेलार गाव तर नांदूरा तालुक्यातील ७० कि़मी. दुर्गम भागात असलेल्या धाडी येथेही महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. धाडी या ठिकाणी २ कि़मी. पायी चालत शाळेला जावे लागते. त्यामुळे महिला शिक्षिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.