धक्कादायक! विवाहित प्रेमी युगुलाची खामगावात आत्महत्या
By अनिल गवई | Published: November 17, 2022 04:14 PM2022-11-17T16:14:34+5:302022-11-17T16:18:34+5:30
विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव: विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
बाळापूर तालुक्यातील कळंबी महागाव येथील विकास पंजाबराव सावळे (३२)आणि सौ. शीतल तायडे (३०) अशी या विवाहित प्रेमी युगुलाची नावे आहे. बुधवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका लॉजमध्ये विवाहित जोडपे म्हणून राहण्यासाठी बुकींग केली. रात्री हे जोडपे लॉजमधील खोलीत झोपी गेले.
दरम्यान, सकाळी बराचवेळपर्यंत या जोडप्याच्या खोलीतून कोणत्याही हालचाली जाणवल्या नाहीत. दरवाजा ठोठावल्यानंतर तसेच आवाज देऊनही आतून कोणत्याही हालचाली आढळून आल्या नाहीत. अखेरीस या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी शहर पोलीसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले.
या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेतील विवाहितेला तीन मुले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते दोघे जवळचे नातेवाईक असल्याची चर्चा असून, आत्महत्येपूर्वी दोघांनी आत्महत्येचे स्टेशन ठेवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती.