राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ; आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:51 PM2018-03-01T13:51:37+5:302018-03-01T13:51:37+5:30
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना मानधन न देता केवळ प्रकरणानुसार अत्यंत कमी मोबदला दिला जातो. परंतू या मोबदल्यासाठी सुद्धा अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने सध्या राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ सुरू आहे.
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना मानधन न देता केवळ प्रकरणानुसार अत्यंत कमी मोबदला दिला जातो. परंतू या मोबदल्यासाठी सुद्धा अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने सध्या राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ सुरू आहे. त्यामुळे आशा वर्कर्स तथा गट प्रवर्तक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
महिलांची सुरक्षित प्रसूती, नवजात बालकांना योग्य ते लसीकरण तसेच माता-बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत आशा वर्कर्स तथा गट प्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडून वेळोवेळी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, शौचालयांचे सर्वेक्षण, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण, लोकसंख्या सर्वेक्षण, कुष्ठरोग आणि कॅन्सर या आजारांचे सर्वेक्षण केले जाते. आरोग्याच्या क्षेत्रात एवढे महत्वपूर्ण कार्य करणाºया आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना सरकारकडून कोणतेही निश्चित दरमहा मानधन दिले जात नाही. केवळ केसेसनिहाय त्यांना अत्यंत तोकडा मोबदला दिला जातो. हा मोबदला देखील सहा-सहा महिने मिळत नाही. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सीटूच्या झेंड्याखाली आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहे. मात्र शासनाकडून सातत्याने त्यांना केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. या आंदोलनात आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी वेतन सुरू करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, राष्ट्रीय आरोग्य मिशन कायमस्वरूपी करा, इंडियन लेबर कौन्सीलच्या शिफारसीप्रमाणे सर्व योजना कामगारांना १५ हजार रुपये दरमहा मानधन द्या, जननी सुरक्षा योजने अंतर्गत सर्व प्रसूतीचा मोबदला द्या, विमा, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन इत्यादी सुविधा सुरू करा, अशा विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक आदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
मुंबईच्या आझाद मैदानावर करणार आंदोलन
विविध मागण्यांसाठी निर्णायक आंदोलन करण्याच्या उद्देशाने ७ मार्चला आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे विशाल धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूचे जिल्हा सेक्रेटरी पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, वर्षा शेळके, शांता हिंगे, अरुणा रत्नपारखी, ऊर्मिला माठे, मंदा म्हसाल, ज्योती खर्चे, चंदा झोपे, विजया ठाकरे यांनी केले आहे.