कोरोनाचा वाढता संसर्ग बघता प्रशासनाने ग्रामपातळीवर गाव स्तरीय समिती नेमणुकीचे आदेश दिले असून, या समितीच्या सदस्यांनी करावयाची कर्तव्ये दिली आहेत. या समितीमध्ये आरोग्य सेवक हे नोडल अधिकारी असून, समिती सदस्य म्हणून तलाठी, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, आरोग्य सेविका व कोतवाल हे काम पाहणार आहेत. या समितीद्वारे गावातील कोविड रुग्णांना आयसोलेशन करून घेण्याकरिता विलगीकरण कक्षाची उभारणी करून देणे, विलगीकरण कक्षातील रुग्णांचे आशांमार्फत दैनंदिन तापमान, ऑक्सिजन लेवल तपासणी करतील व त्याद्वारे गंभीर रुग्ण आवश्यकतेनुसार संबंधित सेंटरमध्ये हलविण्याबाबत कार्यवाही करतील, अशा सूचना आहेत. दरम्यान, खासदार व आमदार यांनी या समितीमधील कर्मचारीच गैरहजर असतात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना गैरहजर असणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याकरिता आदेश दिले आहेत.
११ मेपासून ज्या ठिकाणी ग्रामस्तरीय पथक सदस्य हजर नसतील, त्यांचा अहवाल तहसीलदार यांना सादर करावा. सर्व तलाठी हजर राहतील याची खात्री करणे बंधनकारक केले आहे. २० मे २०२१ पर्यंत कडक अंमलबजावणीमध्ये हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निश्चितपणे कडक कारवाई होईल.
गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी, मेहकर.