एडी सिरिंजचा जिल्ह्यात मुबलक साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:45+5:302021-09-14T04:40:45+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात एडी सिरिंजचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने लसीचा संभाव्य अपव्यय टळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे, तसेच ...
बुलडाणा : जिल्ह्यात एडी सिरिंजचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने लसीचा संभाव्य अपव्यय टळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे, तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे लसीचा वेस्टेजही शून्य टक्के आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत लस देण्यासाठी प्रामुख्याने एडी सिरिंजचा उपयोग केला जातो; मात्र केंद्र शासनाकडून गत काही दिवसांपासून एडी सिरिंजचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे राज्यात एडी सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणासाठी दोन सीसी सिरिंजचा वापर केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा जिल्ह्यांमध्ये लसीच्या वेस्टेजचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
तुलनेने बुलडाणा जिल्ह्यात स्थिती चांगली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एडी सिरिंजचा मुबलक साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मोहिमेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी हे लसीकरणासाठी प्रशिक्षित असल्याने वेस्टेजचे प्रमाणही शून्य टक्क्यांवरच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
२६ हजार एडी सिरिंज उपलब्ध
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एडी सिरिंजचा तुटवडा भासत असला, तरी जिल्ह्यात सद्य:स्थितीत एडी सिरिंजचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे २६ हजारांपेक्षा जास्त एडी सिरिंज उपलब्ध आहेत, तसेच येत्या गुरुवारपर्यंत आणखी एडी सिरिंज पाेहोचणार आहेत.
काय आहे एडी सिरिंज?
एडी सिरिंज ही ऑटो डिसेबल आहे. म्हणजेच या सिरिंजचा एकदा वापर केल्यानंतर ती लॉक हाेते. त्याचा पुन्हा वापर करणे शक्य नाही. त्यामुळे ही सिरिंज पूर्णत: सुरक्षित आहे, तसेच यामध्ये औषधांची लिमिट सेट केलेली असते. त्यापेक्षा जास्त औषध भरता येत नाही.
जिल्ह्यात एडी सिरिंजचा तुटवडा नाही. सध्या २६ हजार एडी सिरिंज उपलब्ध असून येत्या गुरुवारपर्यंत आणखी पुरवठा हाेणार आहे, तसेच एका दिवसाला साधारणत: आठ ते दहा एडी सिरिंजचा वापर करण्यात येताे. सुटीच्या दिवशी लसीकरण कमी असते. एडी सिरिंजमुळे लसीच्या वेस्टेजचे प्रमाण शून्य आहे.
- डाॅ. रवींद्र गाेफणे, जिल्हा लसीकरण अधिकारी, बुलडाणा
दररोज लागतात आठ ते दहा हजार सिरिंज
जिल्ह्यात दररोज सरासरी आठ ते दहा हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, दररोज आठ ते हजार एडी सिरिंजचा वापर केला जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्क्यांवर असल्याने सिरिंजही वेस्टेज जात नाही. त्यामुळे उपलब्ध लसीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण शक्य होत आहे.