दीडशे रुपयांची लाच स्वीकारताना धाड येथील पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:23 PM2018-04-10T16:23:44+5:302018-04-10T16:23:44+5:30
बुलडाणा : जखमी बैलावर उपचार करण्यासाठी प्रारंभी दोन हजार २०० रुपये घेऊनही पुन्हा दीडशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी धाड येथील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.
बुलडाणा : जखमी बैलावर उपचार करण्यासाठी प्रारंभी दोन हजार २०० रुपये घेऊनही पुन्हा दीडशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी धाड येथील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले. धाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. धाड परिसरातील एका शेतकऱ्याच्या बैलाला शेतात वखरणी करताना उजव्या पायास वखराची लोखंडी पास लागून हा बैल जखमी झाला होता. या बैलाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी धाड येथील वर्ग एक श्रेणीच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे याने तीन वेळा उपचार करून व्हीजीट फिच्या नावाखआली तक्रारकर्त्या शेतकऱ्याकडून दोन हजार २०० रुपये घेतले होते. नऊ एप्रिल रोजी शेतकरी पुन्हा बैलाच्या पायावर उपचार करण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यास बोलवण्यास गेले होते. तेव्हा डॉ. पाचरणे यांनी दहा एप्रिल रोजी ४०० रुपये घेऊन या असे सांगत नंतर उपचार करतो अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी दहा एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात बैलाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी दीडशे रुपयाची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे धाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्या दरम्यान, तक्रारदार शेतकर्याकडून दीडशे रुपये पंचासमक्ष स्वीकारून रमेश पाचरणे याने ते त्याच्या मनी पॉकेटमध्ये ठेवले होते. प्रकरणी पैसे घेताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले व लाचेची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत केली. याप्रकरणी पशुधन विकास अधिकारी रमेश बाजीराव पाचरणे याच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम सात, १३(१) (ड) सह १३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलिस उपअधीक्षक शैलेष प्र. जाधव याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. बी. भाईक, पथकातील कर्मचारी संजय शेळके, विजय वारुळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, मधुकर रगड यांनी कारवाीत सहभाग घेतला होता. दरम्यान, लाचेची मागणी करणार्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधख विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. दरम्यान, याप्रकरणी धाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.