डोणगाव: येथील महामार्गावर असलेल्या भल्या मोठय़ा खड्डयात एका ट्रकाचे चाक फसल्याने हा ट्रक थोडक्यात बचावला. अन्यथा मोठा अपघात होत होता. येथील बाजारपेठ तसेच बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मोठमोठे खड्डे अपघातास आमंत्रण देत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. येथील बाजारपेठला लागून असलेल्या महामार्गावरुन सतत जड वाहनाची ये-जा सुरू असते. याच महामार्गावर गत काही महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडून अनेक अपघात घडत आहेत . या संदर्भात सार्वजनीक बांधकाम विभागाकडे शिवसेनेतर्फे अँड.रामेश्वर पळसकर, निंबाजी पांडव, उत्तमराव परमाळे, प्रकाश मानवतकर यांनी निवेदन देऊन खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी केली होती. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर खड्डे मुरुमाने बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु एकाच पावसात सदर खड्डयामधील मुरुम वाहून गेल्याने अनेक दुचाकीस्वार त्यामध्ये घसरुन पडले. ३१ ऑगस्टला सकाळी याच महाकाय खड्डयामधून एक ट्रक जात असतांना त्या खड्डयामध्ये गुंतून पलटी होता होता वाचला आणि अनर्थ टळला. ट्रक पलटी झाला असता तर मोठा अपघात झाला असता. तरी आता सदर खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.
खड्डय़ांमुळे अपघात वाढले
By admin | Published: September 01, 2014 10:23 PM