जानेफळ : देशी कट्टा, मॅक्झिन व चार जीवंत काडतुसासह आरोपीस अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायगाव दत्तापूर नजीक सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर देशी कट्टा जप्त करण्यात आल्याने खबबळ उडाली आहे. दुचाकीवरुन देशीकट्टा विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने जानेफळ - नायगाव दत्तापूर दरम्यान नाकाबंदी केली. मिळालेल्या वर्णनाच्या आधारानुसार पिवळ्या रंगाची पगडी बांधून आरोपी सतनामसिंग प्रतापसिंग बावरी (वय ३०) हा भरधाव वेगात एम-एच -२८ -एस- ५३३७ क्रमांकाच्या दुचाकीने येत होता. नायगाव दत्तापूर नजीकच्या पुुुलाजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ १ देशी बनावटीचा कट्टा, ४ जीवंंत काडतुसे व १ मॅक्झिन आढळून आली. याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. आरोपीस अटक करून जानेफळ पोलीसांंच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. आर. इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चांदुरकर, शेख साजिद, संदीप मोरे, विजय सोनुने, चालक भारतसिंग राजपूत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
देशी कट्टयासह आरोपी अटकेत; एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:33 PM