रेमडेसिविरचा काळाबाजार प्रकरणातील आरोपींना १० मे पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 10:52 AM2021-05-09T10:52:21+5:302021-05-09T10:53:13+5:30
Remdesivir black market case राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे अशी या आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रेमडेसिविरच्या काळ्याबाजार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी रेमडेसिविरच्या काळ्याबाजार प्रकरणी बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनसह रोख सात हजार रुपये, दोन दुचाकी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे अशी या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. आरोपींना बुलडाणा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची १० मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, आता एक ओरिजनल आणि आठ बनावट रेमडेसिविर इंजेक्शन या आरोपींनी कुठून मिळविले, या दिशेने पोलिसांचा तपास राहील. सोबतच संबंधित दोन्ही नामांकित रुग्णालयातील कर्मचारी व प्रसंगी डॉक्टरांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भाने ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, चौकशीत ज्या पद्धतीने माहिती समोर येईल, त्या पद्धतीने आमचा तपास राहील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत कोण कोण संशयाच्या भोवऱ्यात येतो व त्यांच्या चौकशीतून काय बाहेर येते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.
रिकामे रेमडेसिविर आरोपींकडे कसे?
रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर झाल्यानंतर त्यावर मार्किंग तथा ज्या रुग्णाला देण्यात आले आहे त्याचे नाव त्या खोक्यावर लिहून रिकाम्या इंजेक्शनची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पूर्वीच दिल्या आहेत. मात्र त्याउपरही या आरोपींकडे रिकाम्या इंजेक्शनचे खोके, कुपी कशा आल्या हाही पोलिसांच्या तपासाचा प्रसंगी भाग राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.