- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील अनेक वाहनचालक वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण तपासणीकडे कानाडोळा करीत आहेत. गत वर्षभरात प्रदूषण पसरविणाऱ्या ४३३ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २ लाख ८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नजर ठेवण्यात येते. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याचा वाहतूक विभागाचा नियम आहे. वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी पीयूसी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या केंद्रांची संख्या कमी असल्याने वाहनचालकांना वाहनांच्या तपासणीसाठी ‘वेटिंग’वर राहावे लागते. परिणामी, अनेक वाहने तपासणीविनाच राहत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान १ हजार १७८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोषी आढळून आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांची प्रदूषण नियंत्रण तपासणी नियमित करण्यात येत नाही. यामुळे ही वाहने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करत असून यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
वाहनचालकांनी आपल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे अनिवार्य आहे. सध्या सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत पीयूसी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण चाचणीविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.-जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.