किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत विनामास्क व विनाकारण फिरणारे तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. ठाणेदारांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना व रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चोप दिला आहे. दोन दिवसांत किनगाव राजा परिसरातून मास्क न लावणारे, विनाकारण फिरणाऱ्या २४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लावण्यात आलेला कडक निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. यासंदर्भाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ठाणेदार व इतर कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या २४३ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ९५० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा उघडून इतर दुकान मालक यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आपली दुकाने उघडणाऱ्या सात दुकान मालकांविरुद्ध कलम १८८, सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कारवाईमुळे पोलीस स्टेशन किंवा किनगाव राजा हद्दीमध्ये तसेच हद्दीबाहेरील विनामास्क फिरणारे व अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोणीही विनामास्क व विनाकारण घराबाहेर फिरू नये, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता कोणती आपली दुकाने उघडू नये, असे आढळल्यास पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी, असे आवाहन किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी केली आहे.