नांदुऱ्यात पकडला एमपीतून आलेला ३० लाखांचा गुटखा; अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई

By अनिल गवई | Published: April 3, 2024 05:39 PM2024-04-03T17:39:34+5:302024-04-03T17:40:47+5:30

ट्रकसह ४६ लाखांचा मुद्देमाल.

action of additional superintendent of police in buldhana gutkha of 30 lakhs from mp caught in nandura | नांदुऱ्यात पकडला एमपीतून आलेला ३० लाखांचा गुटखा; अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई

नांदुऱ्यात पकडला एमपीतून आलेला ३० लाखांचा गुटखा; अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई

अनिल गवई, नांदुरा: प्रतिबंधीत गुटख्याची मध्यप्रदेशमार्गे चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षकांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३० लक्ष रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि १५ लक्ष रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव येथील अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांना प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने नांदुरा शहरातील जळगाव जामोद रेल्वेगेट जवळ नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी केली असता, एम. एच. २८ बीबी ७२०६ या चारचाकी मोठ्या ट्रकमध्ये प्रतिबंधीत पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखूचे ३६ मोठे पोते आढळून आले. याप्रकरणी दोघां आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून वाहनासह ४५,८५,०००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल-

कपील राजु मिरेकर वय २४ वर्षे रा संजयनगर वॉर्ड क्रं १० जाफ्राबाद रोड देऊळगाव राजा व दीपक नागप्पा काटकर वय ४५वर्षे रा दिनदयाल नगर वॉर्ड क्रं १२ चिखली या दोघांविरुद्ध भांदवि कलम १८८,२७३,३२८,तसेच सहकलम अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६चे कलम २६(२),(iv)शिक्षापात्र कलम ५९(i) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

असा आढळला गुटखा साठा-

पान मसाल्याचे पांढऱ्या रंगाचे मोठे ३६ पोते कारवाईत आढळले. यात प्रत्येक पोत्यात लहान ८ प्लास्टिक पिशव्या, प्रत्येक पिशवीत २५नग पान मसाला पाकिटे,जाफरानी जर्दाचे मोठे ७ लालसर पांढरे पोते प्रत्येक पोत्यात ५ लहान प्लास्टिक पोते, पान मसाल्याचे ४ पोते प्रत्येक पोत्यात १०प्लास्टिक बॅग, तंबाखू चे २मोठे निळसर पोते , िबग तंबाखूचे १० खाकी बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये १० लहान पिशव्या असा एकुण ३० लाख रुपयांचा गुटखा साठा आढळून आला.

गुटखा चिखली येथील माफीयाचा -

प्रतिबंधित असलेला आणि मंगळवारी रात्री पकडण्यात आलेला गुटखा साठा चिखली येथील एका बड्या गुटखा माफीयाचा असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चिखली, देऊळगाव राजा आणि मलकापूर येथील गुटखा माफीयाचा साठा पोलीसांनी जप्त केला होता. दरम्यान, कारवाईत बडे मासे सोडल्या जात असल्याने, अवैध गुटखा वाहतूक आणि गुटखा विक्रीला प्रतिबंध घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

Web Title: action of additional superintendent of police in buldhana gutkha of 30 lakhs from mp caught in nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.