पोकरा, रोहयो कामांमध्ये दिरंगाई; ४६ कृषी सहाय्यकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 11:45 AM2021-07-07T11:45:42+5:302021-07-07T11:45:47+5:30
Action taken against 46 agricultural assistants : १६ कृषी सहाय्यकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे तसेच ३० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात पोकरा योजनेची अंमलबजावणी करणे तसेच रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवता जिल्ह्यातील १६ कृषी सहाय्यकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे तसेच ३० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्म्यान प्रकार सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत कृषी सहाय्यक, सेवकांनी आंदोलनाचे विविध टप्पे सुरू केले आहेत. त्यामध्ये ६ जुलैला काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
कृषी सहाय्यक संघटनेने बुलडाणा जिल्ह्यात कृषी सहाय्यक, सेवकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू केले. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. जिल्ह्यात पाेकरा, रोहयोची अंमलबजावणी करताना ती कामे पिछाडीवर असल्याचा ठपका कृषी सहाय्यकांवर ठेवण्यात आला. त्याला जबाबदार धरून जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची वेतनवाढ तात्पुरती तसेच कायमस्वरूपी रोखण्यात आली तर ३० जणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली. त्यामध्ये समाधानकारक खुलासा नसल्यास पुढील कारवाई होणार आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील कृषी सहाय्यक धास्तावले असून आता त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारला आहे.
१२ जुलैपासून लेखणी बंद
जिल्ह्यातील कृषी सहायकांवर प्रस्तावित कारवाई मागे घेणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विविध अडचणी सोडवा, क्रॉपसॅपअंतर्गत प्रलंबित अनुदान द्या, पोक्राअंतर्गत विविध अडचणी सोडवा, या मागण्या आहेत.
n त्या पूर्ण न झाल्यास ६ व ७ जुलैला काळ्या फिती लावून काम करणे, ८ जुलैला जिल्ह्यातील सर्व कृषी सहायक अतिरिक्त पदभार सोडून देतील, विविध कार्यालयीन व्हॉटस्अप ग्रुपमधून बाहेर पडणे, ९ जुलैला ऑनलाईन ॲप्स वापरावर बहिष्कार टाकणे, १२ जुलैपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन करणार आहेत.