"अब्दुल गद्दार" म्हणत आदित्य ठाकरे संतापले, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:03 PM2022-11-07T18:03:24+5:302022-11-07T18:05:52+5:30
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. आता, सत्तार यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका घेत सत्तारांना चांगलंच सुनावलं.
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. यासंह, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही नेत्यांनी सत्तारांविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. आता, आदित्य ठाकरे यांनीही बुलढाण्यातील सभेतून सत्तारांवर निशाणा साधत ''अब्दुल गद्दार'', असे म्हटले.
“आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.
अब्दुल सत्तारांची माफी
सुप्रिया सुळेंवरील खालच्या पातळीच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत मोठा संताप उफाळून आला आहे. हा विरोध पाहता सत्तारांनी माफी मागितली. माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.