बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:58 AM2020-07-01T10:58:56+5:302020-07-01T10:59:28+5:30
संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गासह तत्सम कारणांनी बाजार समित्यांच्या निवडणुकांना २४ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या आत प्रशासकांना या बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती तथा खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ मधील १५ अ कलमाचा आधार घेत संचालक मंडळांची मुदत संपलेल्या बाजार समित्यांवर प्रशासकांची जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. यात प्रामुख्याने चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, लोणार, जळगाव जामोद आणि संग्रापूर बाजार समित्यांचा समावेश आहे. स्थानिक सहाय्यक निबंधक हे या बाजार समित्यांचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान जळगाव जामोद येथील बाजार समितीवर शेगाव येथील सहाय्यक निबंधक बी. एन.कोल्हे तर संग्रामपूर बाजार समितीवर जळगाव जामोद येथील सहाय्यक निबंधक श्रीमती एस. पी. जुमडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलीमध्ये जी. पी. साबळे, मेहकरमध्ये जी. एस. फाटे, देऊळगाव राजात एस. यू. जगदाळे, लोणारमध्ये आर. एल. हिवाळे यांच्याकडे प्रशासकाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात येथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
निवडणुकीस दिलेली मुदत वाढही संपणार
यापूवी २४ जानेवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती. तीही आता २४ जुलै रोजी संपत आहे. कोरोना ससंर्गाच्या संकटामुळे कायद्यातील १४ (१) कलमचा आधार घेत अपरिहार्य कारणामुळे ही मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र आता २४ जुलै नंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने कोणती पावले उचलल्या जातात याकडे लक्ष लागून आहे.
सात वर्षापासून रखडल्या निवडणुका
जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा आणि मोताळा बाजार समित्यांवरही सध्या प्रशासक कार्यरत असून २००९ ते २०१३ दरम्यान या तिन्ही बाजार समित्यांची निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र मधल्या कालात निवडणुकासंदर्भात बदलेले निर्णय, त्यासाठी निधीची अडचण पाहता या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जुना निर्णय बदलण्यात आल्याने या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आता त्या प्रत्यक्षात कधी होतील, याकडे लक्ष लागून आहे.
आणखी तीन बाजार समित्यांची मुदत संपतेय
बुलडाणा बाजार समितीची १५ जुलै, खामगाव बाजार समितीची २३ जुलै आणि नांदुरा बाजार समितीची २८ जुलै रोजी मुदत संपत असून या तीन बाजार समित्यांवरही महिना अखेर प्रशासक नियुक्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.