प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर मृत मुलाच्या वडिलांचीही आत्महत्या

By निलेश जोशी | Published: December 23, 2023 09:23 PM2023-12-23T21:23:43+5:302023-12-23T21:23:49+5:30

दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद: एकाच चितेवर पितापुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

After the suicide of the loving couple, the father of the dead child also committed suicide | प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर मृत मुलाच्या वडिलांचीही आत्महत्या

प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर मृत मुलाच्या वडिलांचीही आत्महत्या

साखरखेर्डा: सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील मृत मुलाच्या वडिलांनीही २३ डिसेंबर रोजी बांधकाम सुरू असलेल्या एका घरात गळफास घेत जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर शेंदुर्जन येथे, तर मृत पिता-पुत्राच्या पार्थिवावर साखरखेर्डा येथे शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणात साखरखेर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

२२ डिसेंबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलामधील मुलगा २२ वर्षांचा होता, तर मुलगी ही अल्पवयीन होती. दोन दिवसांत तिघांनी आत्महत्या केल्यामुळे परिसर हादरला आहे. शेंदुर्जन येथील अल्पवयीन मुलगी व २२ वर्षीय युवक १८ डिसेंबर पासून बेपत्ता होते. त्यांनी गुंजमाथा परिसरातील समाधान किसन गवई यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणात मृत मुलाच्या वडिलांकडे साखरखेर्डा पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशी केली होती. त्याची कुणकुण लागल्याने या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर २३ डिसेंबर रोजी प्रेमी युगुलामधील मृत मुलाचे वडील समाधान खिल्लारे यांनीही साखरखेर्डा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका घरात गळफास घेऊन सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. 

दरम्यान, तिघांच्या पार्थिवाचे सिंदखेड राजा येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर, मृत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर शेंदुर्जन येथे तर मृत मुलगा व त्याच्या वडिलांच्या पार्थिवावर साखरखेर्डा येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिहेरी आत्महत्या प्रकरणामुळे साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे या घटनाक्रमामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मृत मुलीच्या पार्थिवावर शेंदुर्जन येथे, तर मृत मुलगा व वडिलांच्या पार्थिवावर साखरखेर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास साखरखेर्डा पोलिस करत आहेत.
 

Web Title: After the suicide of the loving couple, the father of the dead child also committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.