अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:10+5:302021-06-23T04:23:10+5:30
बुलडाणा : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे सर्वच ठिकाणची भाजीपाला ...
बुलडाणा : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे सर्वच ठिकाणची भाजीपाला बाजारपेठ बंद होती. यादरम्यान शेतकऱ्यांना भाजीपाला शहराच्या ठिकाणी नेता आला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांची नासाडीही झाली. आता अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्क्यांनी महागल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलडाणा शहरात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. सकाळी शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांची विक्री होते. जिल्ह्यातील शेतकरी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भाजीपाला टेम्पोद्वारे घेऊन येतात. यानंतर या ठिकाणचे ठोक विक्रेते भाजीपाला शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्यानंतर ते छोट्या विक्रेत्यांना विकतात. महागाईने कळस गाठला असून अनलॉकनंतर आता भाजीपाला महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात असला तरी शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळत नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत बाजारपेठेत चवळी ४० रुपये, वांगे ४० रुपये, शेवगा ६० रुपये, कारले ५०, भेंडी ३०, दोडका ३५ रुपये किलोप्रमाणे विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
.............प्रतिक्रिया................
पुन्हा वरणावर जोर
गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला महाग झाला आहे. त्यामुळे रोजच आम्हाला वरण करावे लागत आहे. कधी घट्ट वरण तर कधी पातळ वरण फोडणी देऊन खातो.
- शोभा तायडे, गृहिणी
..................प्रतिक्रिया......................
महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबर काही दिवसांपासून भाजीपालाही महाग झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डाळीचे वरण फोडणी देऊन खावे लागत आहे.
-मनीषा वानखडे, गृहिणी
...............प्रतिक्रिया.................
म्हणून वाढले दर...
दोन महिन्यांपूर्वी भाजीपाला मार्केट हे पूर्णत: बंदच होते. आजमितीस अनलॉक झाले असल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे.
- कमलेश तायडे, व्यापारी
...............प्रतिक्रिया................
ठोक विक्रेत्याकडून आम्ही भाजीपाला खरेदी करतो. काही भाज्यांची आवकही सध्या कमीच आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडला तर पालेभाज्यांची किंमत कमी होऊ शकेल. ठोक विक्रेत्यांकडून सकाळच्या वेळेला भाजीपाला खरेदी करत असतो. त्यानंतर ग्राहकांना विकला जातो. - प्रल्हाद इंगळे, व्यापारी
.............प्रतिक्रिया.............
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
शेतात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवतो; परंतु कोरोना महामारीमुळे शहराच्या ठिकाणी माल नेता येत नव्हता. आता अनलॉक झाले आहे. त्यामुळे भाजीपाला व्यवसायाला चांगले दिवस येतील असे वाटते.
- प्रशांत वानखडे, शेतकरी
सद्य:स्थितीत पाणी भरपूर आहे. सर्वत्र भाजीपाला पिकतो; परंतु कोरोनामुळे बहुतांश वेळा भाजीपाल्याची विक्री होत नाही. त्यामुळे नाइलाजाने शेतातील भाजीपाला शेतातच टाकून द्यावा लागतो. आता चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.
- श्रीकृष्ण जाधव, शेतकरी