खामगाव : शासनाने डाळवर्गीय धान्यासाठी साठा मर्यादेची अट टाकल्याने त्याविरोधात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी व्यापाऱ्यांनी शेतीमालाची खरेदी बंद केली. त्यामुळे समितीमध्ये विक्रीसाठी माल आणलेल्या शेतकऱ्यांची ऐनवेळी पंचाईत झाली. विक्रीसाठी आणलेला माल त्यांना परत न्यावा लागला.केंद्र शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना डाळवर्गीय धान्य (मूग वगळता) साठ्याची मर्यादा निश्चित केली. आँक्टोबर २०२१ पर्यंत ही मर्यादा राहणार आहे. त्यामध्ये घाऊक व्यापाऱ््यांना १०० मे. टन, तर किरकोळ व्यापाऱ््यांना ५ मेट्रीक टनाची मर्यादा आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आतापर्यंत खरेदी केलेल्या धान्याच्या साठ्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मागवण्यात आली. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी शेतमालाची खरेदी बेमुदतपणे थांबवली. सोमवारी त्याबाबतची माहिती शेतकऱ््यांना नसल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी माल आणला होता. मात्र, खरेदी बंद असल्याने त्यांना माल परत न्यावा लागला. तर साठ्याची मर्यादा उठवली जात नाही, तोपर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय खामगाव बाजार समिती व्यापारी-अडते मंडळाने घेतला आहे.त्यासाठी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष फत्तू चांडक यांच्यासह दीपक खानचंदाणी यांनी व्यापाऱ््यांना आवाहन केले. त्यानुसार बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी थांबवण्यात आली आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक दीपक जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर शासनाकडून लवकरच उपाययोजना केली जात आहे, असे सांगितले.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 11:13 AM