संग्रामपुर: उशिराने सुरू झालेल्या पावसाने शासकीय कामे निकृष्ट असल्याची पोलखोल झाली आहे. कृषी विभागने बांधलेला सिमेंट बंधारा निकृष्ट असल्याचा अहवाल चक्क तलाठ्यानेच दिल्याने बिंग फुटले आहे.आदिवासी बहुल भाग असल्याचा फायदा घेत अधिकारी व कर्मचारी शासकीय निधींचा गैरवापर करून थातूरमातूर कामे आटपून घेत आहेत. असाच एक प्रकार कृषी विभागाकडुन झाला असल्याचे उघडकीस आले आहे. सोनाळा भाग २ शिवारातील गट नं. ७५३ व ७५५ च्या धुऱ्यावर कृषी विभागाने सि एन बी सी (सिमेंट बंधारा) बांधला. २८ जूनरोजी मुसळधार पाऊस झाल्याने सिमेंट बंधारा पूर्णता भरला. परंतु बांध निकृष्ट असल्याने त्याची एक बाजू फुटली. त्यामुळे लगतच्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने एका शेतकºयाची शेती खचल्याने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात सोनाला येथील शेतकरी शामराव भिवटे यांनी सोनाळा भाग-२ तलाठी कडे विनंती अर्ज करून पंचनामा करण्याची मागणी केली. तलाठी ए. आर. खरे यांनी शेत शिवारात जाऊन पाहणी केली असता त्यांना बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा निकृष्ट असल्याचे दिसून आला. बंधारा निकृष्टपणे बनवण्यात आल्यामुळे तो फुटला असा अहवाल त्यांनी दिल्याने कृषी विभाग कृषी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.संग्रामपूर तालुक्यात इतर ठिकाणी बांधण्यात आलेले बंधारे या अहवालामुळे संशयाच्या भोवºयात सापडले आहे. कृषी विभागाच्या निकृष्ट कामामुळे सोनाळा येथील शामराव भिवटे यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई या शेतकºयाला मिळेल का. तसेच तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे निकष मापदंड तपासणी करण्यात येईल का असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
कृषी विभागाचा सिमेंट बंधारा निकृष्टच; तलाठ्याचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 4:00 PM