बुलडाणा: येथील प्रसिद्ध किटक छायाचित्रकार तथा अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांच्या किटक छायाचित्रणाचा समावेश इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, प्रा. शेवडे यांच्या या छंदाची यापूर्वी ‘किटकांची सफर’ या नावाने लिमका बुकमध्येही नोंद झालेली आहे. आजपर्यंत प्रा. अलोक शेवडे यांनी बुलडाणा शहर परिसरातील जंगलामधील ३०० च्यावर किटक प्रजातींचे छायाचित्रण केले आहे. एक प्रकारे त्या माध्यमातून त्यांनी या किटकांच्या प्रजातींचा एक प्रकारे शोधच लावला आहे. किटकांचे सौंदर्य, किटकांचा स्वभाव व किटकांचे व्यक्तीमत्त्व या बद्दल प्रा. शेवडे सखोल अभ्यास करीत आहेत. किटकांच्या अंतरंगाचा वेध घेणारा ‘किटक विश्व-अंतरंग दर्शन’ अर्थात ‘जॉय अॅट फिंगर टिप्स’ हा स्लाईड शो देखील ते सध्या सादर करतात. या शो चे राज्यात जवळपास २०० पेक्षा अधिक कार्यक्रम झालेले आहेत. या त्यांच्या अनोख्या उपक्रमाची अनेकांनी दखल घेतली आहे. ज्यामध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अक्षय चक्रवर्ती (बंगलोर), डॉ. स्वामीनाथन (उदयपूर), डॉ. गोविंद गुजर (दिल्ली), राजदत्तजी (चित्रपट दिग्दर्शक, मुंबई), वनराई फाऊंडेशन नागपूरचे डॉ. गिरीश गांधी यांचा समावेश आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्या किटकांच्या अनोख्या छंदाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यासंदर्भातील अधिकृत पत्र त्यांना शुक्रवारी मिळाले. हे आहे अनोखेपण बुलडाणा शहर परिसरासह लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील किटककांचे प्रा. अलोक शेवडे तासनतास निरीक्षण करतात. सोबतच हे किटक लिलया ते आपल्या बोटावर अगदी सहजतेने घेतात व त्यानंतर त्यांचे छायाचित्र काढतात. असो अनोखा मुलखा वेगळा त्यांचा छंद आहे. त्यातील हे अनोखेपण पाहूनच त्यांच्या या छंदाची इंडिया बुक आॅप रेकार्डर्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
अलोक शेवडेंच्या कीटक छायाचित्रांचा ‘इंडिया बुक’मध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:15 PM