बुलडाणा : गतवर्षीपासून काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे़ आधीच पाेटच्या मुलांनी व नातेवाइकांनी वाऱ्यावर साेडलेल्या वृद्धांनाही काेराेनाचा फटका बसला आहे़ काहींना गेल्या वर्षभरापासून, तर काहींना सहा महिन्यांपासून कुणीही भेटायला आले नसल्याचे चित्र हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात भेट दिल्यानंतर समाेर आले़ घरापासून कोसोदूर असलेले अनेक वृद्ध आपल्या जीवनातील शेवटचे क्षण आश्रमात व्यतीत करीत आहेत. अनेक वृद्धांची आपल्या जवळच्या नातेवाइकांशी वर्षापासून भेटगाठ नसून, मुले व आप्तेष्ट वद्धाश्रमाकडे फिरकले नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे़ तसेच वृद्धाश्रमात मदतही आटल्याचे चित्र समोर आहे. हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमाला भेट दिली असता तेथील वृद्धांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपली करुण कहाणी ‘लोकमत'जवळ मांडली. शासनाकडून २५ लाेकांसाठी अनुदान मंजूर झालेले आहे़ त्यातून या निराधारांचा खर्च भागवला जाताे़ २५ लाेकांचे अनुदान मिळत असले तरी ३५ ते ४० जणांना ठेवण्याची व्यवस्था आश्रमात आहे़
मुलांनी व जवळच्या नातेवाइकांनी वाळीत टाकलेल्या वृद्धांचा भरणा अधिक दिसून आला. कोणी इंजिनिअर, कोणी अधिकारी, तर कोणी शिक्षक असूनही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे़ कोरोनाने नातेवाईक दूर केले; परंतु वृद्धाश्रमात राहणारे आधीच समाज व नातेवाइकांपासून दूर आहेत. त्यांचे चार भिंतीआड असलेले जग या निमित्ताने सर्वच काही सांगून जाते. सुनांसोबत पटले नाही म्हणून वीस वर्षांपासून वृद्धाश्रमात आहे. कुणीही भेटीला येत नाही. शासन व संस्थेच्या मदतीतून त्यांचा निर्वाह चालतो, शासकीय अनुदान वेळेवर मिळत नाही, हे वास्तव असले तरी सामाजिक जाणीव ठेवून वृद्धाश्रम चालविला जातो. मात्र, कोरोनाच्या संकटामध्ये आता मदतीचे हातही काही प्रमाणात अखडले आहेत़ मदतीचा ओघ घटला आहे.
वृद्धाश्रम शासकीय मदतीवर चालतो. बाहेरून सामाजिक मदत एखाद्यावेळी धान्य स्वरूपात मिळते. सामाजिक मदत मिळत नसल्याने व शासकीय अनुदान वेळेवर मिळत नसल्याने बहुतेक मदतीचा ओघ आटला आहे. आश्रमाच्यावतीने वृद्धांची आवश्यक ती काळजी घेऊन त्यांना आधार देण्यात येताे़ तसेच काेराेना संसर्गाविषयीही उपाययाेजना करण्यात येत असल्याचे आश्रमाचे सचिव संताेष गाेरे यांनी सांगितले़
भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावर
काेराेना संक्रमण सुरू हाेण्यापूर्वी वृद्धाश्रमात भेट देणाऱ्यांची संख्या माेठी हाेती़ सहा महिन्यांतून, तर कुणी तीन महिन्यांतून एकदा या वृद्धांना भेटायला त्यांचे मुले, नातेवाइक येत हाेते़ मात्र, काेराेना संक्रमण वाढल्याने गत काही वर्षांपासून वृद्धाश्रमात भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे़
गत एक वर्षापासून वृद्धाश्रमात आहे़ काेराेनापूर्वी नातेवाईक भेटायला येत हाेते़ मात्र, गत सहा महिन्यांपासून नातेवाईक भेटायलाच आले नाहीत. या आश्रमाचाच आधार आहे.
एक महिला
सुनांबराेबर पटत नसल्याने मुलाने या वद्धाश्रमात आणून टाकले़ काेराेनापूर्वी मुलगा भेटायला यायचा़ काेेराेना संक्रमण वाढल्यापासून मुलाच्या भेटीची दरराेज वाट पहावी लागत आहे़
एक वृद्ध
एक वर्षापासून वृद्धाश्रमात आहे़ गतवर्षी काेराेना संक्रमण सुरू हाेण्यापूर्वी नातेवाईक भेट हाेते़ आता विवेकानंद आश्रमच आयुष्याच्या शेवटच्या काळात आधार आहे़
एक वृद्ध
वृद्धाश्रमात एकूण २५
महिला ०८
पुरुष १७