- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी येथे केवळ 78 प्राण्यांची झाली होती. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत राबविण्यात आला. निसर्ग अनुभव घेण्यासाठी अभयारण्यात 25 पाणवठ्यावरील 25 मचान उभारण्यात आले होते. यादरम्यान 25 वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 25 वन्यजीव प्रेमींनी यामध्ये नोंदी केल्या. 25 पैकी 17 वन्यजीव प्रेमी अभयारण्यात हजर झाले. यामध्ये नागपूर औरंगाबाद पुणे तसेच गुजरात राज्यातील वन्यजीव प्रेमीनी सहभाग दर्शविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आलेल्या प्राणी गणनेमध्ये अंबाबरवा अभयारण्यात 78 प्राण्यांची नोंद घेण्यात आली होती. यामध्ये 18 अस्वल, ३ हरीण, 15 सांभर, 9 गवा, 11 मोर, 7 रान डुक्कर, 2 म्हसण्या उद, व 13 नील गाईंचा समावेश होता. एकाच वर्षात अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे. यावर्षी ऐकून 540 वन प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये वाघ 4, बिबट 6, अस्वल 19, तडस 1, गवा 3, सांबर 14, भेळकी 24, सायाळ 2, म्हसण्या उद 27, नील गाय 47, जंगली डुक्कर 105, माकड 133, व इतर 155 प्राण्यांची नोंद घेण्यात आली. प्राणी गणनेसाठी अंबाबारवा अभयारण्यात कुत्रीम व नैसर्गिक मिळून 25 पाणवठ्यांची संख्या होती. 17 वन्य प्रेमींनी सहभाग दर्शविला. वन कर्मचाऱ्यांची संख्याही 25 होती. अंबाबरवा अभयारण्यात निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपसना रक्षक अकोट टी बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक एस जे खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर कांबळे, वनपाल एन डी राऊत, डी डी सोनोने, एम आर राठोड, बी एम डुकरे, एस व्ही कायंदे आदी कर्मचारी प्राणी गणनेला उपस्थित होते.
बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बाहेर राज्यातल्या पर्यटकांनी सहभाग दर्शविला. चंद्राच्या लखलखीत प्रकाशात अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांनी दर्शन दिले. त्यांची नोंद घेण्यात आली आहे.
- एस. आर. कांबळे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी सोनाळा