सध्या राज्यात कोविड - १९ साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्क साधता येणार आहे. संपर्कासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० देण्यात आला आहे. सोबत अडचण किंवा तक्रार ऑनलाइन पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ई -मेल वर येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक थोडक्यात किंवा ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा छायाचित्र व्हॉट्सॲप किंवा ई - मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल, ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप वापर करणे शक्य नसेल त्यांनी भ्रमणध्वनी वर तोंडी तक्रार नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
ऑनलाइन तक्रारीची सुविधा
अनेक शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर खत किंवा बियाणे मिळत नाही. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचणी येतात. निकृष्ठ बियाण्यांचा प्रश्न असतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याने त्यांचा चांगला उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच ऑनलाइन तक्रारीची शेतकऱ्यांना करता येणार आहेत.
काय म्हणतात शेतकरी
खरीप हंगामाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. परंतू आता शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केल्याने त्याचे सकारात्मक परिणामच समोर येतील.
संतोष लाटे, शेतकरी.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, मात्र त्याठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही व्हायला पाहिजे. तक्रारींचा नुसता ढीग साचायला नको. त्यावर योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे.
नामदेवराव जाधव, शेतकरी नेते.