अंगणवाडी केंद्राकडून ऑफलाईन आलेल्या अहवालाला ऑनलाईनची जोड देत जिल्हास्तराकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी प्रकल्प स्तरावर येऊन पडली आहे. अंगणवाडीतील पोषण आहार व त्यासंबंधीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सरकारकडून अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनंदिन आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन पद्धतीने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, त्यामध्ये विविध अडचणी येत असल्याने सेविकांनी मोबाईल परत केले.
कामांचा व्याप
अंगणवाडी सेविकांच्या या आंदोलनावर अद्याप यशस्वी तोडगा निघाला नाही. अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केल्याने ऑनलाईन पद्धतीने अहवाल पाठविणे बंद झाले आहे. सध्या जिल्ह्यात पोषण माह अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रमांची माहिती ऑनलाईनऐवजी आता ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी केंद्रातून बालविकास प्रकल्प स्तरावर पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा ताण वाढला आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे २७१२
एकूण अंगणवाडी सेविका २६१९
...म्हणून केला मोबाईल परत
निकृष्ट दर्जाचे मोबाईल. मोबाईलमधील रॅम कमी असल्याने हँग होणे. मराठी भाषेचा अभाव आदी कारणांमुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी मोबाईल वापसी आंदोलन राबविले.
मोबाईलचा दुरुस्ती खर्चही परवडणारा नव्हता.
असून अडचण नसून खोळंबा...
शासनाने दिलेले हे मोबाईल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनले होते. निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घ्या आणि चांगल्या दर्जाचे मोबाईल द्या, मराठी भाषेचा समावेश करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी मोबाईल वापसी आंदोलन केले. या आंदोलनाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली नाही. आता ऑफलाईन पद्धतीने अहवाल पाठविण्यात येतात, अशी माहिती अंगणवाडी सेविकेने दिली.
नवीन आणि चांगल्या दर्जाचे टॅब द्यावेत
मोबाईलची रॅम कमी होती. प्रशासनाकडून वेळोवेळी नवनवीन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जात होते. मोबाईलचा दुरुस्ती खर्चही परवडणारा नव्हता. आता ऑफलाईन काम सुरू आहे. नवीन आणि चांगल्या दर्जाचे मोबाईल किंवा टॅब द्यावेत.
- पंजाबराव गायकवाड,
जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना, बुलडाणा.