बुलडाणा : पीक विमा अर्ज दाखल करण्याची ३१ जुलै शेवटची तारिख असतानाच राज्यात आतापर्यंत ७१ लाख ९३ हजार शेतऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, नऊ आॅगस्टपर्यंत पोर्टलवर शेतकऱ्यांची याबाबतची माहिती अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे कृषी आयुक्त सचिनद्र प्रताप सिंह यांनी ३० जुलै रात्री राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक विमा अर्जाची राज्याची स्थिती जाणून घेतली होती. त्यावेळी ही माहिती समोर आली. ग्लोबल वॉर्मिंग व पावसाच्या सातत्याने पडणार्या खंडामुळे शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. या पृष्ठभूमीवर मान्सूनवर असलेली शेतीची मदार पाहता पीक विमा शेतकर्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. त्यानुषंगाने पीक विमा काढण्याची मुदत शेतकर्यांना वाढवून देण्यात आली होती. ३१ जुलै ही पीक विमा काढण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे या दिवसाच्या पूर्वसंध्येला अर्थात ३० जुलै रोजी कृषी आयुक्त सचिनद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील एकंदर पीक विमा अर्जाच्या स्थितीचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन स्थिती जाणून घेतली. ३० जुलै रोजी रात्री आठ पर्यंत ही व्हीसी सुरू होती. दरम्यान, या सर्व पृष्ठभूमीवर माहिती घेतली असता राज्यात ७१ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. ३१ जुलैला मध्यरात्रीपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागात ३० जुलैला सायंकाळपर्यंत १८ हजार ९३ अर्ज पीक विम्यासाठी आले होते. कोकण विभागात २९ हजार ६००, नाशिक विभागात, २४ हजार ४८७, पुणे विभागात चार लाख ६४ हजार १४७, औरंगाबाद विभागात २८ लाख ३४ हजार ७०९, लातूर विभागात २९ लाख ६३ हजार ६००, अमरावती विभागात आठ लाख सहा हजार १३४ आणि नागपूर विभागात ५२ हजार ८६४ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहे. यात ३१ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात ७१ लाख ९३ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 5:41 PM
बुलडाणा : पीक विमा अर्ज दाखल करण्याची ३१ जुलै शेवटची तारिख असतानाच राज्यात आतापर्यंत ७१ लाख ९३ हजार शेतऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.
ठळक मुद्दे राज्यात ७१ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. ३१ जुलैला मध्यरात्रीपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.